Join us

अशोक सराफ यांना मिसळ देणारा मुलगा आज आहे प्रसिद्ध दिग्दर्शक; तुम्ही ओळखलं का त्यांना?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 1:59 PM

Marathi director: एकेकाळी स्पॉटबॉय म्हणून काम करणारा हा सेलिब्रिटी आज लोकप्रिय मराठी दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो.

कोणत्याही क्षेत्रात यश मिळवणं किंवा ते टिकवणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यासाठी अथक मेहनत, पराभवाचा सामना, कष्ट या साऱ्या गोष्टींमधून जावं लागतं. यात कलाविश्वात तर असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी प्रचंड कष्ट करुन या सिनेविश्वात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यातल्याच एका दिग्दर्शकाविषयी आज जाणून घेऊयात. एकेकाळी स्पॉटबॉय म्हणून काम करणारा हा सेलिब्रिटी आज लोकप्रिय मराठी दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे या दिग्दर्शकाने आज इतकं यश मिळवलंय की त्यांनी अभिनेता अशोक सराफ यांच्यासोबतही काम केलं आहे.

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक महेश टिळेकर (mahesh tilekar) यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांचा फिल्मी प्रवास सध्या चर्चेत येत आहे. महेश टिळेकर यांनी एकेकाळी सेटवर स्पॉटबॉय म्हणून काम केलं. सुरुवातीला महेश टिळेकर यांनी उषा चव्हाण निर्मित, दिग्दर्शित गौराचा नवरा या सिनेमातील एका गाण्यात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामागे मॉब आर्टिस्ट म्हणून काम केलं होतं. परंतु, त्यांना या कामापेक्षा दिग्दर्शन करण्यात जास्त रस होता. याविषयी त्यांनी उषा चव्हाण यांना सांगितलंदेखील.होतं. परंतु, ते नंतर पाहू आधी जे पडेल ते काम करायला लागेल, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी 'धरपकड' सिनेमासाठी स्पॉट बॉय म्हणून काम केलं. यात कलाकारांना नाष्टा देण्यापासून ते त्यांच्या कपड्यांना इस्त्री करेपर्यंत सगळी कामं त्यांनी केली. यात अशोक सराफ यांच्या स्पॉटबॉयचं कामही त्यांनी केलं होतं.

अशोक सराफ  (ashok saraf) यांच्या स्पॉटबॉयचं काम करताना महेश टिळेकरांनी एक किस्सा सांगितला होता. एकदा त्यांनी अशोक सराफ यांनी मिसळ दिली. मात्र, ती त्यांना कमी पडेल म्हणून त्यात पाणी घालून ती वाढवून दिली होती. ही मिसळ घेऊन ते मामांकडे गेले. पण, त्यांच्या मनात भीती होती की मामा काय बोलतील. मात्र, अशोक सराफ यांनी ती मिसळ खाण्यापूर्वी 'तू जेवलास का रे', असा प्रश्न आपुलकीने विचारला. तसंच पाणी घातलेल्या मिसळीबद्दल एक अक्षरही काही बोलले नाहीत. तेव्हापासून महेश टिळेकरांना अशोक मामांच्या स्वभावातील साधेपणा कळून चुकला.

काही काळ स्पॉटबॉय म्हणून काम केल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांच्या करिअरची सुरुवात झाली. त्यानंतर हळूहळू त्यांचा कलाविश्वात जम बसत गेला आणि त्यांनी मालिका, सिनेमांचं दिग्दर्शन, निर्मिती करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे एकेकाळी अशोक सराफ यांचा स्पॉटबॉय म्हणून काम केलेल्या टिळेकरांच्या सिनेमातच चक्क अशोक सराफ यांनी काम केलं.  

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमा