पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केली अन् देशाची चाकं थांबली. कायम घाईघडबडीत असलेला माणूस आपल्या बार्शीसारखा निवांत झाला होता. हा निवांतपणा एवढे दिवस चालला की सर्वांनाच अक्षरश: कंटाळा आला होता. त्यामुळे, कोरोना कधी जाणार आणि लॉकडाऊन कधी संपणार असाच प्रश्न सर्वांना पडला होता.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुनश्च हरिओम म्हटलं अन् कोट्यवधी मराठीजनांना जीव भांड्यात पडला. मात्र, अद्यापही सगळं सुरळीत नाही. अजूनही लोकांचे हाल सुरूच आहेत, हातवर पोट असलेल्यांचा संघर्ष सुरूच आहे. पुनश्च हरिओम या मराठी चित्रपटात हीच संघर्ष कथा साकारण्यात आली आहे.
स्पृहा जोशी आणि विठ्ठ्ल काळे यांनी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील कथा या चित्रपटात साकारली आहे. या चित्रपटाचे काही टिझर सध्या सोशल मीडियावर झळकले असून टेलिव्हीजन मीडियावरही पुनश्च हरिओम लक्षवेधी ठरत आहे. लॉकडाऊनमुळे आपला रोजगार गमावलेल्या विठ्ठलवर आपली गाडी विकण्याची वेळ येते. पैशासाठी सावकार तगादा लावून मागे लागला असतानाच, मोठी स्वप्नपूर्ती करुन विकत घेतलेली जुनी गाडीही घेऊन जाण्याची धमकी सावकाराकडून दिली जाते.
लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य माणसाची व्यथा आणि कथा या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. सावकार आणि कर्जदाराचे उडणारे खटकेल, सावकाराची कर्जदाराच्या बायकोवर पडलेली वाईट नजर, बायकोवर नजर ठेवणाऱ्या सावकाराची गचुंडी धरणारा स्वाभिमानी नवरा आणि या सगळ्यातही प्रेमळ नातं जपलेलं लहानसं कुटुंब.
पुनश्च हरिओम चित्रपटात दाखवलेली कथा ही एका कुटुंबाची नसून राज्यातील, हजारो कुटुंबांची आहे. कित्येकांनी आपला रोजगार गमावल्यानंतर जगण्यासाठी केलेला संघर्ष म्हणजे पुनश्च हरिओम होय. रविवारी झी टॉकीजवर हा चित्रपट प्रिमियर शो दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे, रविवारी एक चांगली आणि तितकीच वास्तवादी कथा मनोरंजनाची मेजवाणी ठरेल.