दिवसाचे १७ ते १८ तासांचं शुटिंग यामुळे त्यांचा बराच वेळ हा मालिकांच्या सेटवरच जातो. या सगळ्या गोष्टींमुळे मालिकांमध्ये काम करणा-या कलाकारांसाठी मालिकेचा सेट जणू दुसरं घर आणि मालिकेतील कलाकार मिळून एक नवं कुटुंब बनतं. मालिकेतील कलाकारांमध्ये काम करता करता एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण होतं. सेटवरच विविध सणांचे सेलिब्रेशन आणि वाढदिवस साजरे होतात. परिणामी मालिकेतील या कलाकारांमध्ये प्रेमाचे आणि आपुलकीचे बंध निर्माण होतात. असंच काहीसं नातं छोट्या पडद्यावरील छोट्या पडद्यावरील ‘एक थी रानी, एक था रावण’ या मालिकेत सृष्टी जैन (मयुरा तलवार) आणि वैष्णवी राव (ताशी) यांच्यात खूप चांगले बॉन्डींग निर्माण झाले आहे. वास्तव जीवनात या दोघी अभिनेत्री एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी बनल्या आहेत. सृष्टी जैन ही बरेचदा वैष्णवीला फिटनेसच्या टिप्स देत असते.
सृष्टीने सांगितले की ती वैष्णवीला तिच्या मालिकेतील 'ताशी' याच नावाने बरेचदा हाक मारते. सेटवर आम्ही दोघींमध्ये छान नाते जमले आहे. बहुदा आम्ही दोघी दुपारचे जेवण एकत्रच करतो. तसंच मोकळा वेळ मिळाला की आम्ही दोघी एकत्रच बाहेर फेरफटका मारायला जातो.
वैष्णवीला माझ्या आईच्या हातचा स्वयंपाक फार आवडतो. ती अनेकदा माझ्या आईला पनीरची भाजी करून आणायला सांगते. फावल्या वेळेत आम्ही दोघी एकमेकींना आपल्या व्यायामाच्या टिप्स देतो आणि एकमेकींच्या फिटनेसवर टिप्पणी करतो. तसंच आम्ही दोघीही आपापले संवाद एकत्रच म्हणतो आणि अभिनयाच्याही टिप्स एकमेकींना देतो. मालिकेत जरी सृष्टी आणि वैष्णवी या एकमेकींच्या विरोधात असल्या, तरी वास्तव जीवनात त्या एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी बनल्या आहेत.