मराठीतला ‘स्टॅन्ड-अप’ मेळावा !!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 4:24 AM
मनोरंजनाची परिभाषा जशी बदलली तशी विनोदाची स्टाईल देखील बदलली आहे. स्मार्ट फोनच्या युगात विनोद देखील स्टॅन्ड-अप कॉमेडीच्या स्वरूपात आला ...
मनोरंजनाची परिभाषा जशी बदलली तशी विनोदाची स्टाईल देखील बदलली आहे. स्मार्ट फोनच्या युगात विनोद देखील स्टॅन्ड-अप कॉमेडीच्या स्वरूपात आला आहे. या डिजिटल माध्यमातील स्टॅन्ड-अप कॉमेडीचे वारे आता मराठीत देखील वाहू लागले आहे. आपण हिंदीत अनेक दिग्गज स्टॅन्ड-अप कॉमेडी कलाकार पाहतो. स्टॅन्ड-अप कॉमेडीच्या स्पर्धेतून नाव- लौकिक मिळणारे कपिल शर्मा याचे उत्तम उदाहरण आहेत. मराठीत स्टॅन्ड-अप कॉमेडीच्या माधमातून हसायला आणि हसवायला कॅफेमराठी घेऊन आले आहेत स्टॅन्ड-अपचा मेळावा म्हणजेच आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी “अतरंगी मराठी स्टॅन्ड-अप कॉमेडी आणि ओपन माइक”.अतरंगी मराठी स्टॅन्ड-अप कॉमेडी आणि ओपन माइकया मराठी स्टॅन्ड-अपची पहिली मैफिल शुक्रवारी दि. २० एप्रिल रोजी कॅफेमराठीच्या दरबारात रंगली. “उफ्फ मेरी अदा”, ”लुख्खे लांडगे” मधले यशोधन तक, हृषिकेश पाटील तसेच ‘जीबीसी न्यूज चॅनेल’चे अँकर राजू जगताप यांनी आपल्या स्टॅन्ड-अपचे शानदार प्रदर्शन केले. कॅफेमराठीचे संस्थापक निखिल रायबोले यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले. हॉस्टेलमधील दिवस, इंजिनीअरिंग लाईफ असे तरुणांचे आवडते आणि जिव्हाळ्याचे विषय विनोदी असतातच पण आपल्या आजीचा ‘प्रोटीन एक्स’चा डबा आपल्याला हसवू शकतो हे प्रेक्षकांनी पहिल्यांदाच अनुभवले. रोहित पोळ यांनीही आपले विनोदी अॅक्ट सादर केले. कॉमेडीची मैफिल अधिक रंगली जेव्हा श्रेयाने सावधान इंडिया आणि जाहिरातींवर आपले विनोदी विचार मांडले. सर्वांचेच अॅक्ट इतके भन्नाट झाले की सर्व प्रेक्षकांनी देखील त्यांचे खूप कौतुक केले. निखिल रायबोले यांनी ही आपले विनोदी किस्से प्रेक्षकांना ऐकवून मैफिलीत अजून भर घातली.