Join us

ही आहे अभिनेत्रींच्या लग्नाची आतली खबर? पाहा त्यांच्या लग्नातले कुठेही न दिसलेले खास फोटो.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2016 2:39 PM

सध्या सर्वत्र बँड बाजा बारातचे सूर ऐकू येत आहेत. तुळशी विवाहानंतर सगळीकडेच लगीनघाई सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...

सध्या सर्वत्र बँड बाजा बारातचे सूर ऐकू येत आहेत. तुळशी विवाहानंतर सगळीकडेच लगीनघाई सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. मग अशा परिस्थितीत चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळींसुद्धा कसे मागे राहतील. मराठी टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतही सध्या ‘आया मौसम लग्नाचा’ अशीच काहीशी परिस्थिती आहे. आपल्या अभिनयाने रसिकांचे मनोरंजन करणारे मराठी मनोरंजन दुनियेतील अभिनेता आणि अभिनेत्री रेशीमगाठीत अडकले आहेत. कुणी आपला जोडीदार स्वतः निवडत लव्ह मॅरेज करणे पसंत केले आहे. तर काहींनी आपल्या आईवडिल तसेच कुटुंबीयांच्या पसंतीला सकारात्मक होकार देत लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. 'अग्निहोत्र', 'कुंकू' यासारख्या मालिकांमधून छोट्या पडद्यावरील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे लग्नाच्या बेडीत अडकली आहे. व्यवसायिक स्वप्नील रावसह एका शानदार सोहळ्यात तिचे शुभमंगल पार पडले. पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात मृण्मयी आणि स्वप्नील यांचा पेहरावसुद्धा तितकाच खास होता. आकर्षक साडीमध्ये नवराई मृण्मयीचं सौंदर्य आणखी खुलून गेले होते. नवरी इतकी नटून थटून तयार असताना नवरदेव स्वप्नीलसुद्धा मागे कसा राहिल. त्याने खास पेशवे स्टाईलमध्ये पगडी आणि कपडे परिधान केले होते. या लग्न सोहळ्याला मृण्मयीचे चित्रपटसृष्टीतील खास मंडळींनी हजेरी लावली. मालिकांसोबतच मृण्मयीने कट्यार काळजात घुसली आणि नटसम्राट या सिनेमातही लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. मृण्मयी आणि स्वप्नीलचे हे अरेंज मॅरेज आहे. छोट्या पडद्यावरील रसिकांची लाडकी राधा अर्थात 'राधा ही बावरी' फेम अभिनेत्री श्रृती मराठेसुद्धा रेशीमगाठीत अडकली आहे. मराठी मालिकांसोबतच मराठी सिनेमा आणि दाक्षिणात्य सिनेमातही आपल्या अभिनयाची छाप पडलेल्या श्रृतीचे शुभमंगल अभिनेता गौरव घाटणेकरशी पार पडले आहे. तुझी माझी लव्हस्टोरी या सिनेमात काम करता करता सेटवर एक अनोखी लव्हस्टोरी खुलू लागली. ही लव्हस्टोरी होती ती या सिनेमातील प्रमुख अभिनेत्री श्रृती मराठे आणि अभिनेता गौरव घाटणेकरची. जवळपास तीन वर्षे हे लवबर्ड्स एकमेकांच्या प्रेमात आंकात बुडाले होते. अखेर एकमेकांना पुरेसा वेळ दिल्यानंतर दोघांनीही लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. दोघांचे शुभमंगल मोठ्या थाटात आणि उत्साहात पार पडले. लग्नानंतर दोघेही बाली इथे जाऊन आपला मधुचंद्र साजरा करणार आहेत. मालिका आणि सिनेमांमधून रसिकांच्या मनामनात अढळ स्थान मिळवणारी आणखी एक कलाकार जोडी काही दिवसांपूर्वी रेशीमगाठीत अडकली ती म्हणजे अभिनेत्री पल्लवी पाटील आणि अभिनेता संग्राम समेळ. एक डिसेंबरला मोठ्या उत्साहात पार पडलेल्या सोहळ्यात पल्लवी आणि संग्राम लग्नबंधनात अडकले. या सोहळ्याला चित्रपट आणि मालिका कलाकारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. अभिनेत्री जुई गडकरी, अभिजीत केळकर, स्वप्नाली पाटील, प्रसाद लिमयेसह अनेक कलाकार पल्लवी आणि संग्रामला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्याकरिता हजर होते. विशेष म्हणजे संग्राम हा जुई गडकरीचा मानलेला भाऊ. त्यामुळे जुई या लग्नसोहळ्यात वराची करवली म्हणून मिरवत असल्याचे पाहायला मिळाले. 'पुढचे पाऊल' या मालिकेतून संग्राम तर रुंजी या मालिकेतून पल्लवी घराघरात पोहचली आहे. दोघांमध्ये आधी लव्ह झाले आणि त्याचे रुपांतर अरेंज मॅरेजमध्ये झाले. मराठी चित्रपटसृष्टीचा आणखी एक उद्योन्मुख अभिनेता लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याचं नाव आहे अभिनेता चिराग पाटील. चिराग आणि सना अंकोला दोघेही नुकतेच रेशीमगाठीत अडकले आहेत. चिराग हा माजी क्रिकेटर संदीप पाटील यांचा मुलगा तर सना ही माजी क्रिकेटर तसेच मॉडेल-अभिनेता सलील अंकोला यांची कन्या आहे. चिराग आणि सना हे दोघेही एकमेंकांना बालपणापासून ओळखतात. गेल्या चार वर्षांपासून ते एकमेंकांना डेट करत होते. अखेर दोघांनीही प्रेमाच्या नात्यातून पती-पत्नीच्या नव्या बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. नुकतेच दोघांचे शुभमंगल कोर्टात साध्या पद्धतीने पार पडले. सलील अंकोला यांनी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली तेव्हा संदीप पाटील हे त्यांचे आदर्श आणि गुरु होते. मात्र चिराग आणि सनाच्या लग्नामुळे गुरु-शिष्याचे आता नव्या नात्यात रुपांतर झाले आहे.2016 या वर्षाच्या अखेरच्या महिन्यात या सेलिब्रिटींनी नव्या बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. मालिका आणि रुपेरी पडद्यावर या सेलिब्रिटींनी आपल्या अभिनयाने रसिकांवर जादू केलीच आहे. आता आपल्या आयुष्याच्या जोडीदारसह या कलाकारांचे वैयक्तीक आयुष्य आणि रिल लाइफ आणखी खुलावे याच शुभेच्छा.