Join us

​सुजोय घोष लिहिणार रितेश देशमुखसाठी मराठी चित्रपटाची कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2017 8:52 AM

रितेश देशमुखने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अल्लादिन या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन, निर्मिती आणि लेखन सुजोय घोषने ...

रितेश देशमुखने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अल्लादिन या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन, निर्मिती आणि लेखन सुजोय घोषने केले होते. तेव्हापासूनच सुजोय आणि रितेशची मैत्री जमली. सुजोय हा एक खूप चांगला लेखक मानला जातो. त्याने झंकार बीट्स, कहानी, तीन, कहानी २ दुर्गा राणी सिंग, तीन यांसारख्या चित्रपटाचे लेखन केले आहे. त्याने लिहिलेले आजवरचे सगळेच चित्रपट गाजले आहेत. त्याला त्याच्या लेखनासाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. सुजोयने आजवर कधीच कोणत्या मराठी चित्रपटासाठी लेखन केलेले नाही. पण लवकरच तो एका मराठी चित्रपटासाठी लेखन करणार आहे. रितेशन देशमुखनेच ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगितली आहे. रितेश देशमुख आणि जॅनलिया डिसोजा देशमुखची निर्मिती असलेला फास्टर फेणे हा चित्रपट सध्या चांगलाच गाजत आहे. या चित्रपटानंतर रितेशने त्याच्या आगामी चित्रपटावर काम करायला सुरुवात देखील केली आहे आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक सुजोय घोष या चित्रपटासाठी कथा लिहिणार आहे.सुजोय घोष आणि रितेशची नुकतीच एक भेट झाली आहे आणि या भेटीविषयी रितेशनेच ट्विटरच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सना सांगितले आहे. रितेशने ट्विटरवर सुजोयचा फोटो शेअर करून त्यात म्हटले आहे की, मी आज या सज्जन माणसाला कॉफीसाठी भेटलो होतो. त्यावेळी माझ्या मराठी चित्रपटासाठी कथा लिहिण्याचे त्याने मला वचन दिले आहे. मी निर्माती जेनेलियाला देखील यात टॅग करत आहे. रितेशच्या या ट्वीटवर महान निर्माती असा रिप्लाय सुजोयने केला आहे. रितेशच्या या ट्विटवरून रितेश त्याच्या आगामी मराठी चित्रपटाच्या कामाला लागला असून या चित्रपटाची कथा सुजय लिहिणार आहे आणि या चित्रपटाची निर्मिती जेनेलिया डिसोजा करणार आहे हे आपल्याला कळून येत आहे. रितेशने आजवर बालक पालक आणि लय भारी यांसारख्या मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खूप चांगला गल्ला जमवला आहे. रितेश हिंदीतील एक प्रसिद्ध अभिनेता असूनही तो मराठी चित्रपटसृष्टीसाठी देखील तितकाच वेळ देत आहे.  Also Read : रितेश देशमुखने केली होती चोरी, घरी सांगितले होते असे काही; वाचा काय आहे किस्सा!