Join us

‘राजा’ची कथा प्रेरणादायी ठरेल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 3:58 AM

कित्येकदा समाजात जे घडतं त्याचं चित्र रुपेरी पडद्यावर उमटतं. सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या सिनेमांसोबतच आदर्शवत वाटाव्यात अशा कथाही सिनेमांच्या ...

कित्येकदा समाजात जे घडतं त्याचं चित्र रुपेरी पडद्यावर उमटतं. सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या सिनेमांसोबतच आदर्शवत वाटाव्यात अशा कथाही सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. ‘राजा’ या आगामी सिनेमाची कथाही अनेकांना प्रेरणादायी ठरावी अशी असल्याचं सिनेमाच्या निर्मात्यांच मत आहे. २५ मे पासून सर्वत्र प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची निर्मिती सत्यसाई मल्टिमिडीया प्रा. लि. या संस्थेअंतर्गत प्रवीण काकड यांनी केली आहे. शशिकांत देशपांडे याचं लेखन-दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले आहे.एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाचा गायक बनण्याचा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटात चितारला आहे. निर्माते प्रवीण काकड यांच्यासमोर ही कथा आल्यानंतर  ही कथा सिनेमारूपात समोर आणण्याची प्रक्रिया सुरू झाली.नैसर्गिक आवाजाची सुरेल देणगी लाभलेल्या एका शेतकऱ्याच्या मुलाचा पॉप सिंगर बनण्याचा प्रवास या सिनेमात आहे. त्रिकोणी प्रेमकथेच्या माध्यमातून ‘राजा’ची कथा सादर केली आहे. ही कथा यशस्वीपणे पडद्यावर सादर करण्यासाठी कोणताही शिक्का नसलेले मेहनती नवीन चेहरे हवे होते. त्यानुसार सौरदीप कुमार, स्वरदा जोशी आणि निशिता पुरंदरे या तीन नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. अनेक एकांकिका स्पर्धांमधून काम करणाऱ्या सौरदीप व स्वरदा तसेच मिस टियारा स्पर्धेची विजेती निशिता या तिघांनीही आपापल्या व्यक्तिरेखांना न्याय देण्यासाठी जीवापाड मेहनत घेतली आहे. वेळप्रसंगी दुखापत होऊनही सीन पूर्ण करण्याचा त्यांची धडपड सिनेमा पाहताना प्रेक्षकांनाही नक्कीच जाणवेल असं मतही दिग्दर्शकांनी व्यक्त केलं.‘राजा’ हा सिनेमा म्हणजे शून्यातून विश्वनिर्मिती करण्याची प्रेरणा देणारा असल्याचं सांगत निर्माते प्रवीण काकड म्हणाले की, हा सिनेमा म्हणजे एका गायकाचा प्रवास आहे. हा प्रवास सुरेल व्हावा आणि त्या माध्यमातून एक कथाही प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी यासाठी ‘राजा’च्या संपूर्ण टिमने आवश्यक ते सर्व प्रयत्न केले आहेत. उत्कंठावर्धक कथानकाला सुमधूर संगीताची साथ लाभल्यानेही ‘राजा’ हा सिनेमा रसिकांसाठी एक संगीतमय सफर ठरणार यात शंका नाही. लेखनापासून दिग्दर्शनापर्यंत आणि अभिनयापासून सादरीकरणापर्यंत सर्वच बाबतीत हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा ठरेल. प्रमुख भूमिकेतील कलाकार जरी नवीन असले तरी सिनेमा पाहताना कुठेही त्यांचा नवखेपणा जाणवणार नाही. त्यांच्या जोडीला मराठी सिनेसृष्टीतील आजचे आघाडीचे कलाकार असल्याने अभिनयातही अचूक ताळमोळ साधण्यात आल्याचं जाणवेल. सौरदीप, स्वरदा आणि निशिता यांच्या जोडीला या सिनेमात शरद पोंक्षे, जयवंत वाडकर, राजेश भोसले, सुरेखा कुडची, विनीत बोंडे, पौरस देशपांडे आदी कलाकारांच्या यात भूमिका आहेत तसेच अनुपम खेर, सुखविंदर सिंग,जस्लिन मथारु हे पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत आहेत. वलय मुळगुंद, मिलिंद इनामदार आणि केदार नायगावकर यांनी ‘राजा’ साठी गीतलेखन केलं असून, संगीतकार पंकज पडघन यांनी त्यावर स्वरसाज चढवला आहे. सुखविंदर सिंग, उदित नारायण, शान या हिंदीतील दिग्गज गायकांसोबत मिलिंद शिंदे, सायली पडघन, उर्मिला धनगर आदी गायकांनी ‘राजा’साठी गायन केलं आहे. संतोष भांगरे यांनी या गीतांवर नृत्य दिग्दर्शन केलं असून दामोदर नायडू यांनी छायांकन केलं आहे. मनोज संकला यांनी संकलन केलं आहे, तर कार्यकारी निर्मात्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सत्यवान गावडे यांनी सांभाळली आहे.