माणसाने समाजामध्ये रक्ताची नाती बरीच उभी केली.काका मावशी,मामा,दादा अशी एक नाही अनेक… अशीच बरीच नाती असताना खुद्द परिस्थितीने एक नाते तयार केले ते म्हणजे मैत्रीचे नाते… रक्ताचं नसलं तरी कसलीही अपेक्षा नसताना ते आपलं असत. तसेच आमच्या दोघींच्या बाबतीत…
वाईच्या किसनवीर महाविद्यालय मध्ये आम्ही वाणिज्य शाखेत शिकत होतो. अश्विनी महांगडे पसरणी गावाची आणि मी भाग्यशाली सपकाळ बोपर्डी मधली… तसे मैत्री होण्याचा कसलाच संबंध नव्हता. दोघींची गावे वेगळी, दोघींचे ग्रुप वेगळे ,स्वभाव वेगळे.पण एक गोष्ट आम्हा दोघींना जोडणारी होती ती म्हणजे क्लास रूम.क्लास रूम एक असला तरी आमची फक्त तोंडओळख होती.कॉलेज मध्ये अश्विनी प्रत्येक स्पर्धेत पुढे असायची. आम्ही एकत्र आलो ते कॉलेजच्या लोकनृत्य स्पर्धेमधून… प्रॅक्टिस करत असताना आम्ही एकमेकींच्या जास्त जवळ आलो. लोकनृत्य स्पर्धमध्ये पहिले पारितोषिक मिळवले आणि मैत्रीचा श्री गणेश झाला.
ग्रॅज्युएशन नंतर अश्विनीने करियर साठी मुंबई गाठली. सतत आमचे लँडलाइन्ड वरून फोन कॉल्स सुरु असायचे.." डॉल, तू हि ये न मुंबईला" असे सतत तिला वाटायचे … घरचे नाही म्हंटल्यामुळे मी त्यांच्यापुढे जाऊ शकत नव्हते.ती करिअर चा एकेक टप्पा पार करत होती आणि मी छोटी मोठी नोकरी करत लिखाणाचा छंद जोपासत होते.
आयुष्य खरे वेगळे होते ते लग्न झाल्यानंतर भाग्यशाली सपकाळ ची भाग्यशाली अनुप राऊत झाले. पण अश्विनी साठी मी मात्र डॉल च होते.जबाबदारी,नवीन नाती, संसार या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना मैत्रीचा हात दोघींनी घट्ट पकडून ठेवला. वाटा वेगळ्या झाल्या होत्या मात्र मैत्री तशीच राहिली.आयुष्यात येणारे चढ- उतार, यश - अपयश,वैयक्तिक हितगुज,न सांगताही कळणाऱ्या अशा बऱ्याच गोष्टीमुळे मैत्रीची वीण आणखी घट्ट होत होती.
५-६ वर्ष एकत्र येऊन काम करायचे फक्त बोलत होतो मात्र प्रत्यक्षात काहीच होत नव्हते. २१ जानेवारी २०१८ आम्ही नेहमीप्रमाणे बोलत असताना माझी संकल्पना अश्विनी ला सांगितली आणि सुरुवात झाली ‘माहवारी’ वेबसिरीजची… दोन मैत्रिणी एकत्र आल्या.तेही स्वतःसाठी नाही समाजाचे काहीतरी देणं लागतो म्हणून. आम्ही हा सामाजिक विषय घेऊन ‘माहवारी‘ या वेबसिरीज ची निर्मिती करायचं ठरवलं.
ती मुंबई आणि मी पुणे ...स्क्रिप्ट पासून ते लोकेशन पर्यंत आम्ही मोबाईल फोनवरून डिस्कस करत होतो.सगळ्या बाजू आपापल्या पद्धतीने दोघी सांभाळत होतो. शूटिंग चा पहिला दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचा होता.दोघींची सपोर्ट सिस्टीम एवढी स्ट्रॉंग होती की कोणत्याही अडथळा न येता आमच्या टीम च्या सहकार्याने शूटिंग ला सुरुवात झाली.बघता बघता एकाला दुसरा आणि दुसऱ्याला तिसरा अशी आमची टीम उभी राहिली."मोरया प्रोडक्शन हाऊस" आणि "अंशुल प्रोडक्शन" उभे राहिले.
२८ मे ला ‘माहवारी’ चा पहिला एपिसोड आणि ११ जून ला दुसरा...भरभरून प्रतिसाद,प्रतिक्रिया,कमेंट्स यामुळे आम्ही जोमाने कामाला लागलो. वाई,पसरणी,बोपर्डी ,पुणे इथे आत्तापर्यंत शूटिंग केले. मैत्री आणि आता पार्टनर्स म्हणून दोघींना एकमेकींसोबत काम करायला खूप मजा येत आहे.