Join us  

आम्ही दोघी या चित्रपटासाठी मुक्ता बर्वेने शिकली ही गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 8:04 AM

चित्रपटातील भूमिका खरीखुरी वाटावी यासाठी अनेक कलाकार कितीही मेहनत करायला आणि त्यासाठी कितीही वेळ द्यायला तयार असतात. असाच एक ...

चित्रपटातील भूमिका खरीखुरी वाटावी यासाठी अनेक कलाकार कितीही मेहनत करायला आणि त्यासाठी कितीही वेळ द्यायला तयार असतात. असाच एक अलीकडील अनुभव म्हणजे मुक्त बर्वेने ‘आम्ही दोघी’साठी केलेली तयारी. या चित्रपटासाठी ती चक्क विणकाम शिकली आहे.आम्ही दोघी या चित्रपटाची कथा दोन स्त्रियांच्या स्वभाव वैशिष्ट्यावर आणि त्यांच्या नात्यावर बेतली आहे. यातील अमला या व्यक्तिरेखेसाठी विणकाम शिकणे गरजेचे होते. मुक्ताने ते अल्पावधीतच शिकून घेतले आणि त्याचा पुरेपूर फायदा तिला ही भूमिका साकारताना झाला. आम्ही दोघी या नावाप्रमाणेच ही दोघींची कथा आहे. त्यांच्या वाटा वेगळ्या पण मार्ग एकच आहे. विचार वेगळे पण आवड एकच... त्या वेगळ्या, पण तरीही एकच... ही कथा आहे अमला आणि सावित्री सरदेसाई या दोघींची.चित्रपट आणि रंगभूमीवरील आपल्या कसदार अभिनयाने आपले वेगळे असे स्थान निर्माण केलेल्या मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट यांच्या या आगामी मराठी चित्रपटात वेगळ्या भूमिका आहेत. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे सादरीकरण आणि निर्मिती असलेला हा चित्रपट २३ फेब्रुवारी २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. अभिनेत्री, कॉस्चुम डिझायनर आणि सह-दिग्दर्शक म्हणून चित्रपट रसिकांना माहीत असलेल्या प्रतिमा जोशी यांचे दिग्दर्शनीय पदार्पण ‘आम्ही दोघी’मधून होत आहे. तसेच या चित्रपटाची पटकथा प्रतिमा जोशी आणि भाग्यश्री जाधव यांची आहे आणि सवांद भाग्यश्री जाधव यांनी लिहिले आहेत.“मुक्ता आणि प्रिया या मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या आणि नावाजलेल्या कलाकार आहेत. दोघींनीही वैविध्यपूर्ण भूमिका करत स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांच्या तशाच वेगळ्या भूमिका असलेला हा चित्रपट म्हणजे रसिकांसाठी एक मेजवानीच ठरणार आहे. मराठी रसिक म्हणूनच या चित्रपटाची वाट आतुरतेने पाहत आहेत,” असे उद्गार एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटच्या संजय छाब्रिया यांनी काढले.“आम्ही दोघी’ ही आजच्या तरुणींच्या नातेसंबंधाची गोष्ट आहे. यात आई-मुलगी, मैत्रिणी, बाप–मुलगी, प्रियकर-प्रेयसी अशा नात्यांना स्पर्श केला गेला आहे. प्रत्येक व्यक्तीने फक्त स्वतःच्या दृष्टिकोनातून विचार न करता समोरच्याचा दृष्टिकोनही विचारात घेतला पाहिजे ही बाब या चित्रपटात अधोरेखित होते. त्यामुळेच ती आजच्या प्रत्येक तरुणीला आपली गोष्ट वाटेल,”असे दिग्दर्शक प्रतिमा जोशी यांनी सांगितले.Also Read : ओळखा पाहू फोटोत दिसणारी कोण आहे ही चिमुरडी,जी आहे आजची आघाडीची नायिका