Join us

'कोणी काम देता का काम' म्हणणाऱ्या अभिनेत्रीच्या नव्या बिझनेसची जोरदार घोडदौड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 8:18 PM

काही दिवसांपूर्वी या अभिनेत्रीने सोशल मीडियावर मी एक अभिनेत्री असून चांगला सिनेमा, सिरियल, वेबसीरीज करु इच्छीत आहे अशी पोस्ट टाकली होती.

अभिनेता रितेश देशमुखची निर्मिती आणि रवी जाधव दिग्दर्शित बालक पालक या मराठी चित्रपटात शाश्वती पिंपळीकरने डॉलीची भूमिका साकारली होती. अभिनेता रोहित फाळके, भाग्यश्री संकपाळ, मदन देवधर, किशोर कदम, साई ताम्हणकर अशा विविध कलाकारांची वर्णी असलेला लहान मुलांच्या भाव विश्वातील कल्पनांवर आधारित हा चित्रपट खूप लोकप्रिय ठरला आहे. या चित्रपटातील सर्व कलाकारांच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. काही दिवसांपूर्वी शाश्वतीने नवीन व्यवसाय सुरू केला होता. याबाबत तिने सोशल मीडियावर सांगितले होते. तिच्या या नवीन उद्योगाला खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे समजते आहे.

अभिनेत्री शाश्वतीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर नमस्कार.. माझं नाव शाश्वती पिंपळीकर. मी एक अभिनेत्री असून चांगला सिनेमा, सिरियल, वेबसीरीज करु इच्छीत आहे. अशी पोस्ट टाकली होती. शाश्वतीला केक, पिझ्झा, टोस्टेड ब्रेड, छोले पुरी, आमरस, ट्र्फल आणि मसालेदार चवदार चटकदार पदार्थ बनविण्याचा लहानपणापासून छंद होता. त्यामुळे तिने आपल्या छंदाचे नवीन हॉटेल व्यवसायात रूपांतरित करण्याचे ठरविले. “गाठी भेटी नाहीत, हॉटेलिंग नाही आणि टपरीवर जाऊन चहा वडापाव तर नाहीच नाही ! आपल्यातल्या खादाड पुणेकरांचं आयुष्य अगदीच बेचव झालंय नाही? .. काळजी करू नका आम्ही घेऊन आलोय या सगळ्यावर एक चमचमीत उपाय.. हॉटेलच्या चटकदार चवीचे महाराष्ट्रीयन, पंजाबी पदार्थांसाठी आम्हाला संपर्क साधा ! ” ही तिची पोस्ट मित्र मंडळींनी आणि पुणेकरांनी वाऱ्यासारखी पसरवली..

 मुदपाकखाना – चव तीच आपल्या घरची अशा कल्पक नावाने सुरु केलेल्या तिच्या या व्यवसायाला खवय्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. हॉटेल सारखी चटकदार चव पण घरच्यासारखं स्वछ, सुरक्षित आणि तितकेच मायेने पाच ते पन्नास लोकांसाठी बनवलेले खाद्यपदार्थ ऑर्डर्स ती घेत आहे.

साधारण दोन महिन्याच्या कालावधीत पुण्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य ऑर्डर्स तिला मिळाल्या आहेत. घरच्या सारखी चव आणि हॉटेलचा चटकदार ट्विस्ट असलेले पदार्थ खवय्या पुणेकरांना खूपच आवडत आहेत. 

शाश्वतीने फोटोग्राफर राजेंद्र करमरकरशी लग्न केले आहे आणि तोदेखील या व्यवसायात तिला मदत करतो आहे. शाश्वती आतापर्यंत अनेक मराठी मालिकांमध्ये झळकली आहे. 'चाहूल', 'पक्के शेजारी', 'सिंधू' या मालिकेत तिने काम केले आहे.