कलेवर एखाद्याची निष्ठा, प्रेम असेल तर त्या कलेसाठी ती व्यक्ती काहीही करायला तयार असते. वाटेत कितीही संकटं आली तरी ती व्यक्ती डगमगत नाही. त्यावर मात करत कलेसाठी सर्वस्व पणाला अर्पण करणारे समाजात मोजकेच असतात. सांगलीत राहणा-या काही मित्रांना त्यांची कलेची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. कलेवरील याच प्रेमासाठी स्वतःच्या पोटाला चिमटा काढत नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावं यासाठी निर्मिती क्षेत्रात यायचं ठरवलं. कलेवरील प्रेमापोटी आपले सर्वस्व पणाला लावत सांगलीतील काही मित्रांनी कर्ज काढून 'तेंडल्या' चित्रपटाची निर्मीती केली होती. चित्रपटात नव्या दमाच्या कलाकरांना संधी देण्यात आली.
'तेंडल्या' या चित्रपटाचा जोरदार डंका वाजला. रसिकांसह अनेक पुरस्कारांनी चित्रपटाचा गौरव झाला. राष्ट्रीय पुरस्कारही चित्रपटाला मिळाला. मात्र इतके पुरस्कार मिळूनही चित्रपट बनवणारे निर्मात्यांच्या जीवनात काही बदल झालेला नाही. 24 एप्रिल 2020 रोजी सचिन तेंडूलकर यांच्या वाढदिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, त्याचवेळी कोरोनाचे संकट जगावर पसरले आणि सिनेमाही प्रदर्शन लांबणीवर पडले. आज उद्या कधीतरी परिस्थिती सुधारेल याच आशेवर ही मित्रमंडळी होती. मात्र परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत होती आणि निर्मात्यांच्या देखील अडचणी वाढत होत्या. चित्रपटसुद्धा कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे.
कारण चित्रपट निर्मितीसाठी घेण्यात आलेले कर्ज फेडण्यासाठी शेतात राबण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. चित्रपट निर्मितीसाठी 1 कोटी 70 लाख रुपये कर्ज घेण्यात आले होते. कोरोनामुळे कर्ज फेडणे तर दुरच आर्थिक संकटाने पुरते कंबरडे मोडले आहे. त्यामुळे हे कर्ज फेडण्याचा ते प्रयत्न करत आहेत. जेव्हा पुन्हा सगळे सुरळीत होईल आण कोरोनाचे संकट नाहीसे होईल तेव्हा चित्रपटगृहात रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी रुपेरी पडद्याच्या पिचवर तेंडल्या जोरदार एंट्री करणार असा विश्वास या तरुणांना आहे.