'सुभेदार' या ऐतिहासिक मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. दिग्पाल लांजेकरांच्या श्रीशिवराज अष्टकमधील हा पाचवा चित्रपट आहे. शूरवीर तान्हाजी मालुसरेंच्या असीम शौर्याची गाथा आणि सिंहगडाच्या लढाईचा थरार या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर मांडण्यात आला आहे. अनेक बॉलिवूड चित्रपटांच्या गर्दीत 'सुभेदार' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटात अभिनेता अजय पूरकर यांनी सुभेदार तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारली आहे.
'सुभेदार' चित्रपटाच्या निमित्ताने अजय पूरकर यांनी अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. रेडिओ मिरचीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. अजय पूरकर यांनी या मुलाखतीत मराठी माणसांबद्दल वक्तव्य केलं होतं. मराठी माणसाने व्यवसाय आणि कामासाठी महाराष्ट्र सोडला पाहिजे, असं ते म्हणाले होते. आता त्यांनी मराठी भाषेबद्दल केलेल्या विधानाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
"मी आजही एअरपोर्टवर मराठीतच बोलतो. एखादी फ्रेंच बाई तुमच्याबरोबर फ्रेंचमध्ये बोलते, तेव्हा तुमचा चेहरा बघण्यासारखा होतो की नाही? मग करा ना त्यांचे चेहरे बघण्यासारखे. माझा आसन क्रमांक काय असं विचारा ना...मी मराठीत बोलतोय...तुला मराठी कळतं का? त्यांना सांगू दे ना मराठी येत नाही ते. रेस्टॉरंटमध्ये जाऊन इंग्लिश का बोलायचं? मला माझ्या भाषेत बोलता येतं. त्यांना सांगू देत मराठी येत नाही. मग मी दुसऱ्या भाषेत बोलतो. हा अभिमान आपण टिकवलाच पाहिजे. महाराष्ट्रीयन म्हणून काही गोष्टींचा अभिमान पाहिजेच," असं पूरकर म्हणाले.
Video : "याला म्हणतात संस्कार", 'गदर २'च्या सक्सेस पार्टीत सनीचा लेक पडला शाहरुखच्या पाया
दरम्यान, दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'सुभेदार' सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमात चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर मृणाल कुलकर्णी जिजाऊंच्या भूमिकेत आहेत. श्वेता शेवाळे, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.