Join us

Exclusive: “ऐतिहासिक सिनेमात काहीही काल्पनिक दाखवू नये”, ‘सुभेदार’ची गोष्ट सांगत आहेत दिग्पाल आणि चिन्मय

By कोमल खांबे | Published: August 24, 2023 5:23 PM

दिग्पाल लांजेकरांच्या श्रीशिवराज अष्टकातील पाचव्या चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक होते. 'सुभेदार' चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

‘गड आला पण सिंह गेला’ हे लहानपणापासून आपल्या कानावर पडत आहे. सुभेदार तान्हाजी मालुसरेंनी कोंढाण्याच्या लढाईत प्राणांची आहुती दिली होती. याच लढाईचा थरार आणि मालुसरेंच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू दाखवणारा ‘सुभेदार’ हा चित्रपट २५ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. दिग्पाल लांजेकरांच्या श्रीशिवराज अष्टकातील या पाचव्या चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक होते. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

तान्हाजी मालुसरेंवर याआधीही हिंदी सिनेमा येऊन गेला आहे. ‘सुभेदार’ करताना त्याचं दडपण आलं होतं का?

दिग्पाल लांजेकर : ‘सुभेदार’ चित्रपट बनवताना दडपण नव्हतं. कारण, सिनेमा बनवताना प्रत्येक दिग्दर्शकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. शिवराज अष्टकाच्या सुरुवातीलाच मी हा सिनेमा कसा करायचा हे ठरवलं होतं. त्यानुसार आवश्यक तो रिसर्च करुन त्या गोष्टी चित्रपटात मांडण्यात आल्या आहेत.

मराठी चित्रपटसाठी बजेट फार महत्त्वाचं असतं. ऐतिहासिक सिनेमा करता याचं गणित तुम्ही कसं बांधता?

दिग्पाल लांजेकर : मराठी चित्रपट हा त्याच्या विषयांसाठी जाणला जातो. बजेट कमी असलं तरी त्यातील भावना, आशय याचा विचार करुन, त्यावर काम करुन चित्रपटात मांडतो. शिवरायांप्रतीची निष्ठा आणि श्रद्धा हा या सर्व चित्रपटांप्रति असलेला स्थायीभाव आहे. तो प्रेक्षकांच्या मनाला भिडतो आणि प्रेक्षकांनी वारंवार मला सपोर्ट केलेला आहे.

अनेकदा चित्रपटांमध्ये लिबर्टी घेतली जाते. ऐतिहासिक सिनेमांमध्ये लिबर्टी घेणं कितीपत योग्य वाटतं?

दिग्पाल लांजेकर : आपला इतिहास काही ठिकाणी ऐतिहासिक पुरावे आणि कागदपत्रांच्या अभावी अपुरा आहे. त्यामुळे काही गोष्टींचे संदर्भ लागत नाहीत. अशावेळी मग तेव्हाच्या काळात परिस्थिती काय असू शकते याचा विचार केला जातो. ऐतिहासिक सिनेमांमध्ये एवढीच लिबर्टी घ्यावी. कथानक रंजक करण्यासाठी स्वत:च्या कल्पनेतील काहीही दाखवू नये, असं मला वाटतं. 

सिंहगडाची लढाई म्हटलं की घोरपडीचा उल्लेख येतो. काही ठिकाणी घोरपडे बंधूंचा तर काही ठिकाणी घोरपडीच्या सहाय्याने मावळे गड चढल्याचा उल्लेख आहे. सिनेमात असे संदर्भ देताना तुम्ही कशाप्रकारे अभ्यास करता? याचा निर्णय कसा घेतला जातो?

दिग्पाल लांजेकर : सिंहगडाच्या लढाईत घोरपडीचा उल्लेख फक्त एका पोवाड्यात आहे. ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये तसा उल्लेख आढळत नाही. अशावेळी आम्ही दोनपेक्षा जास्त संदर्भग्रंथात ( कादंबरी किंवा कविता नाही) प्रसंगाचा उल्लेख असेल, तरच ते गृहित धरुन चित्रपटात त्याची मांडणी करतो.

आता शिवराज अष्टकातील सहावं पुष्प कोणाल अर्पण केलं जाणार आहे? पुढचा चित्रपटाची तयारी सुरू झाली आहे का?

सहाव्या पुष्पाची तयारी सुरू झाली आहे. कथा अंतिम टप्प्यात आहे. एका वेगळ्या विषयावर या चित्रपटातून भाष्य करण्यात येईल. 

शिवाजी महाराजांच्या कोणत्या गुणांचा राज्यकर्त्यांनी अभ्यास केला पाहिजे?

दिग्पाल लांजेकर : महाराजांची कृषीनिती आणि पर्यावरणनितीचा अभ्यास राज्यकर्त्यांनी केला पाहिजे.  त्यामुळे बळीराजासाठी चांगल्या योजना आत्ताचे राज्यकर्ते नक्कीच निर्माण करू शकतील.

जेव्हा सर्वात पहिल्यांदा तू स्वत:ला महाराजांच्या लूकमध्ये पाहिलंस काय भावना होत्या?

चिन्मय मांडलेकर : दिग्पालच्या ‘फर्जंद’ चित्रपटाचं स्क्रिप्ट मी वाचलं होतं. पण, त्यात मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळेल असं कधी वाटलं नव्हतं. दिग्पालने मला भूमिकेसाठी विचारल्यानंतर आम्ही लूक टेस्ट केली. पहिल्यांदा जेव्हा मी महाराजांच्या रुपात स्वत:ला पाहिलं, तेव्हा भारावून गेलो होतो. महाराजांची भूमिका करण्याची माझी खूप इच्छा होती. शिवरायांचं वर्णन मी ऐकून होतो आणि त्याप्रमाणे महाराजांच्या भूमिकेसाठी आपण जाऊ शकतो, हे मला वाटलं होतं. पण, मला वाटून काहीच उपयोग नाही. हे दिग्दर्शकाला वाटलं पाहिजे. माझ्या सुदैवाने असा दिग्दर्शक मला मिळाला.

महाराजांची भूमिका साकारताना काय काळजी घेतोस?

चिन्मय मांडलेकर : महाराजांची भूमिका साकारताना दडपणापेक्षाही जबाबदारीची जाणीव असते. लोकांच्या मनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला तडा जाऊ नये, ही प्राथमिक जबाबदारी असते. त्यामुळे अभिनय करताना त्याचं भान नेहमी ठेवावं लागतं. नाहीतर मग लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं.

ऐतिहासिक चित्रपट बनवताना काय काळजी घ्यावी?

चिन्मय मांडलेकर : दिग्पालने आत्तापर्यंत शिवाजी महारांजावर चार सिनेमे केले आहेत. पण, यातील एकाही सिनेमावरुन वाद निर्माण झालेला नाही. कारण, संपूर्ण अभ्यास करुनच हे चित्रपट बनवले गेले आहेत. महाराज, त्यांचे मावळे यांच्या प्रती चित्रपट बनवताना जो आदर बाळगला जातो, तो खूप महत्त्वाचा आहे. तुमचं बजेट कमी जास्त झालं, टेक्निकल एखादी चूक झाली, तर लोकं दुर्लक्ष करतात. पण, शिवरायांच्या बाबतीत काही चुकीचं दाखवलं, तर लोक माफ करणार नाहीत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणता गुण तुझ्या मनाला स्पर्शून गेला. आजच्या सद्य परिस्थितीत अशी कोणती गोष्ट आहे ज्याचा राज्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे, असं तुला वाटतं?

चिन्मय मांडलेकर : राज्यकर्त्यांनी महाराजांची दूरदृष्टी अंगीकारणं अत्यंत गरजेचं आहे. स्वराज्याप्रती महाराज आणि मावळ्यांमध्ये ज्या प्रकारची निष्ठा होती, ते खूप महत्त्वाचं आहे. हे चित्रपट करायला घेतल्यानंतर मला शिवकालीन अनेक गोष्टी समजल्या. आपण शाळेत जो इतिहास शिकलो, तो केवळ मार्कांपुरता होता. ती इतिहासाची तोंडओळख होती, असं म्हणता येईल. त्यात सविस्तर वर्णन नव्हतं. या चित्रपटाच्या निमित्ताने मी वाचन केलं. दिग्पालबरोबर राहिलो तेव्हा ही गोष्ट जाणवली.

तू सोडून इतर कोणत्या कलाकाराने साकारलेली महाराजांची भूमिका आवडते?

चिन्मय मांडलेकर : जेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला सुरुवात केली, तेव्हा मी चंद्रकांत मांढरे यांना डोळ्यासमोर ठेवलं होतं. त्यांनी ज्या पद्धतीने महाराज साकारले ते माझ्यासाठी आदर्शवत आहेत. ज्या ज्या कलकारांनी महाराजांची भूमिका साकारली त्यांनी १०० टक्के ती उत्तमरित्या साकारण्याचा प्रयत्न केला.

 

टॅग्स :दिग्पाल लांजेकरचिन्मय मांडलेकरमराठी अभिनेतामराठी चित्रपटछत्रपती शिवाजी महाराज