सध्या मराठी प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत म्हणून सिद्ध झालेला सुबोध भावे नेहमीच आपल्या प्रत्येक कलाकृतीमधून वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो आहे. सिनेमा असो किंवा मालिका दोन्ही ठिकाणी सुबोध भावे मराठी प्रेक्षकांचा लाडका झाला आहे. याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे त्याने निवडलेली भूमिका आणि त्याच्या अभिनयातला सहजता प्रेक्षकांना भावून जाते. आता ज्योती प्रकाश फिल्मस संस्थे अंतर्गत हरिश्चंद्र गुप्ता निर्मित, डॉ. राज माने दिग्दर्शित सुबोध भावे आणि भार्गवी चिरमुले यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘काही क्षण प्रेमाचे’ हा चित्रपट १२ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे छायांकन जितेंद्र आचरेकर यांनी केले आहे. तर अशोक पत्की यांनी चित्रपटाचे संगीत केले आहे.
प्रत्येक कुटुंबात चांगले आणि वाईट क्षण येत असतात. अनेक वाईट क्षण पचवत कुटुंब प्रेमाचे क्षण अनुभवत असते. यात कुटुंब प्रमुखाची सर्वात मोठी जबाबदारी असते. घर आणि कामाचे ठिकाण या दोन्ही ठिकाणी त्याला समप्रमाणात वेळ द्यावा लागतो, त्यात त्याची आयुष्यभर कसरत सुरु असते. या संघर्षात त्याला त्याच्या पत्नीची साथ आवश्यक असते, असेच काहीसे या सिनेमाचे कथानक आहे. सिनेमात सुबोध भावे आणि भार्गवी चिरमुले यांच्याबरोबरच विजू खोटे, जयराम नायर, मनोज टाकणे, मैथली वारंग, छाया माने, प्रशांत भेलांडे, ज्योती निसाळ, विलास उजवणे, नरेश ठाकूर, नरेंद्र भोईर, कमलाकर पाटिल आणि नामदेव पाटिल हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
सुबोध भावे सिनेमाविषयी सांगतो की, 'सध्या प्रेक्षकांना नाटक, मालिका आणि सिनेमा यामधून सर्वसामान्य गोष्टी बघायला आवडतात. प्रेक्षक त्याच गोष्टींना आपलसे करतात ज्या त्यांच्या आयुष्याशी निगडीत आहेत. पडद्यावर सुरु असलेल्या घटना आपल्या आयुष्यात देखील घडतात असे वाटल्यावर ते त्या सिनेमाशी एकरूप होतात. काही क्षण प्रेमाचे या सिनेमाची हि गोष्ट देखील अशाच एका सर्वसामान्य कुटुंबातील सुंदर शिंदे नावाच्या माणसाची आहे. जो आपल्या स्वभावामुळे आणि चांगल्या वागण्याने आपल्या आजूबाजूच्या लोकांची मने जिंकतो. आपले कुटुंब सुखी आणि समाधानी राहावे अशीच सर्व सामान्य लोकांसारखी त्याचीही धडपड असते. या धावपळीत त्याला कुटुंबात काही क्षण प्रेमाचे मिळत नाही. मग त्यासाठी देखील त्याचे प्रयत्न सुरु होतात, हे काही प्रयत्न कसे त्याच्या अंगाशी येतात आणि संपूर्ण कुटुंब एका वेगळ्याच वळणावर निघून जाते अशी या सिनेमाची गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येक मराठी प्रेक्षक या सिनेमाची जोडला जाईल अशी मला खात्री आहे.'