Subodh Bhave, Har Har Mahadev: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या चित्रपटांना प्रेक्षक येत नसल्याची ओरड दिसून येत आहे. त्या दरम्यान ब्रह्मास्त्र वगळता इतर कोणत्याही हिंदी चित्रपटांना फारशी गर्दी झाल्याचे दिसले नाही. नुकताच, २५ ऑक्टोबरलाबी बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारचा ‘रामसेतू’ व अजय देवगणचा ‘थँक गॉड’ हे दोन सिनेमे रिलीज झाले. पण ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) या चित्रपटाने त्यांना मागे टाकले. अभिजीत देशपांडे यांनी दिग्दर्शित केलेला ‘हर हर महादेव’ हा मराठी सिनेमा आहे. पण हिंदी, तामिळ, कन्नडसह एकूण पाच भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रमी मावळे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारित या चित्रपटाने हिंदी चित्रपटांनाही धोबीपछाड दिल्याचे पाहायला मिळाले आहे. तशातच, या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका समर्थपणे पेलणाऱ्या सुबोध भावेचेही कौतुक होत आहे. या दरम्यान, भाजपाचे नेते आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खास पत्र लिहून सुबोध भावेच्या विशिष्ट कृतीसाठी मानाचा मुजरा केला.
"प्रिय, सुबोधजी भावे, झी स्टुडिओ निर्मित हर हर महादेव या चित्रपटात आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली व या भूमिकेसाठी मिळणारे मानधन स्वतःसाठी खर्च न करता ते शिवरायांनी ज्यांच्यासाठी स्वराज्य निर्मिले त्या उपेक्षित, वंचितांसाठी खर्च करण्याचा जो संकल्प केला तो मनाला भिडला. मुळात ही भूमिका करायला मिळणे हेच आपले मानधन असल्याची उदात्त भावना आपण व्यक्त केली. आपल्या विविध भूमिकांमधील अष्टपैलू महाराष्ट्राने अनुभवले आहेच, मात्र आपल्या या संकल्पातून सामाजिक जाणिव जपणारा संवेदनशील मनाचा माणूस आम्ही अनुभवला. आपण विषयीचा आदर द्विगुणित झाला. आपल्या या कृतीला, संकल्पाला माझा मानाचा मुजरा. आपणासारखे ज्येष्ठ व श्रेष्ठ अभिनेते मराठी रंगभूमी, चित्रसृष्टीची शान आहे. आपल्या उत्तरोत्तर यशासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!!" अशा शब्दांत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्र लिहून सुबोध भावेचे कौतुक केले.
‘हर हर महादेव’ चित्रपटात सुबोध भावे याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तर अभिनेता शरद केळकरने बाजीप्रभूंची भूमिका केली आहे.
सुबोध भावे भूमिकेबद्दल...
"स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा असं आपण नेहमी ऐकतो, वाचतो. त्याप्रमाणेच मी ही भूमिका साकारावी, ही माझी किंवा दिग्दर्शकाची नाही तर प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती असं मला वाटतं. बावीस वर्षांपूर्वी जेव्हा मी मुंबईत आलो होतो, स्ट्रगल करत होतो त्यावेळी एका मालिकेसाठी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. त्यावेळी माझी निवड झाली नाही. महाराजांची ही भूमिका करण्यासाठी मला तब्बल २२ वर्षे वाट बघावी लागली. कदाचित महाराजांचीच ही इच्छा असेल की, मी माणूस म्हणून अजून प्रगल्भ व्हावं, अभिनेता म्हणून या भूमिकेसाठी अधिक तयार व्हावं, म्हणूनच एवढ्या कालावधीनंतर ही भूमिका माझ्याकडे आली. या भूमिकेला मी पूर्णपणे समर्पणाची भावना दाखवली म्हणूनच ती साकारणं शक्य झालं," असे सुबोध भावे भूमिकेबद्दल बोलताना म्हणाला.