Join us

सततच्या ट्रोलिंगवर सुबोध भावे भडकला, म्हणाला, "रस्त्याने जाताना कुत्री भुंकतात तेव्हा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 12:11 PM

सुबोध भावेने ट्रोलिंगला कंटाळत घेतली रोखठोक भूमिका

मराठीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) नेहमी वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. सुबोधने साकारलेल्या अनेक बायोपिक तर प्रचंड गाजल्या. 'बालगंधर्व'साठी त्याने घेतलेली मेहनत असो किंवा 'डॉ काशीनाथ घाणेकर' यांची भूमिका असो, सुबोधचं प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केलं. मात्र कलाकारांचं नेहमी कौतुकच होईल असं नाही. अनेकदा त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. सुबोधही सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगला सामोरा जात आहे. या ट्रोलिंगवर आता मात्र शांत बसणार नाही असं सुबोधने नुकतेच एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

'सेलिब्रिटी कट्टा' ला दिलेल्या मुलाखतीत सुबोधला सध्या होत असलेल्या ट्रोलिंगवर प्रश्न विचारण्यात आला. चांगलं काम केल्यावरही निगेटीव्ह ट्रोलिंग करणाऱ्यांना काय सांगशील असं विचारताच सुबोध म्हणाला, 'मी त्यांना काहीच नाही सांगणार. त्यांची तेवढी पात्रताच नाही की मी त्यांना सांगावं. आपण रस्त्यावरुन जाताना कुत्री भुंकतातच आणि जर सतत भुंकत असतील तर मात्र ती डोक्यात जातात. त्यामुळे कधीतरी हातात दगड घ्यावा लागतो ज्यामुळे ती शांत बसतील.'

सुबोध पुढे म्हणाला, 'जे माझ्या कामावर टीका करतात त्यांच्याविषयी माझ्या मनात प्रेम आहे काही राग नाहीए. ज्यांना माझं काम अजिबात आवडत नाही त्यांच्यावरही माझं प्रेम आहे. पण जे कारण नसताना सतत त्यांची नकारात्मकता घेऊन येतात ना ते लोकं माझ्या डोक्यात जातात. आतापर्यंत मी शांत बसलो पण आता शांत बसणार नाही, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देईन.'

'हर हर महादेव' चित्रपटावरुन वाद झाल्यानंतर सुबोधने यापुढे ऐतिहासिक भूमिका करणार नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र सुबोध नुकताच 'ताज:डिव्हायडेड बाय ब्लड' या वेबसिरीजमध्ये दिसला. यामध्ये त्याने बिरबलाची भूमिका साकारली तर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे अकबराच्या भूमिकेत दिसले. झालं तर मग 'तू तर ऐतिहासिक भूमिका करणार नव्हता ना' असं म्हणत सुबोधला ट्रोल करायला सुरुवात झाली. यानंतर अनेक कारणांनी सुबोध अजुनही ट्रोल होत आहे. त्यामुळे आता मात्र शांत बसणार नाही असं सुबोधने थेट स्पष्ट केलं आहे. 

टॅग्स :सुबोध भावे मराठी अभिनेतासोशल मीडियाट्रोल