अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave ) हा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रयोगशील अभिनेता. सतत काहीतरी नवीन भूमिका करण्यावर त्याचा भर असतो. सुबोध भावे प्रत्येक भूमिकेत जीव ओततो आणि प्रेक्षक त्याच्या अदाकारीवर फिदा होतात. बालगंर्धव, लोकमान्य टिळक, काशिनाथ घाणेकर यांच्या भूमिका लीलया पेलणारा सुबोध आता आणखी एका ऐतिहासिक भुमिकेत दिसणार आहे आणि ही भुमिका आहे दस्तुरखुद्द छत्रपती शिवरायांची.
नुकतीच सुबोधने या चित्रपटाची घोषणा केली होती. ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) असं या चित्रपटाचं नाव आहे. आता या चित्रपटाबद्दल सुबोधने एक नवी अपडेट शेअर केली आहे.
सुबोधने शिवरायांच्या वेशभूषेतील एक खास फोटो शेअर करत, या चित्रपटाच्या मुहूर्ताबद्दल माहिती दिली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचं त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड या भाषेतही हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सुबोधची ‘हर हर महादेव’बद्दलची ताजी पोस्ट वाचून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आम्ही तुला शिवरायांच्या भूमिकेत पाहायला प्रचंड आतुर आहोत. ट्रेलर कधी येतो याची वाट पाहतोय, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. खूप मनापासून वाट पाहतोय, जबरदस्त असाणार आहे हर हर महादेव, अशा शब्दांत एका चाहत्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. समोरच्या व्यक्तिला समजून त्याची भूमिका आत्मसात करून त्या व्यक्तिच्या इतिहासाला योग्य न्याय मिळवून देणारा एकमेव अभिनेता, अशा शब्दांत एका चाहत्याने सुबोधचं कौतुक केलं आहे.
सुबोध भावे मूळचा पुण्याचा. सिम्बॉयसिस कॉलेजमधून त्याने आपले शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर एका आयटी कंपनीमध्ये आपल्या करियरची सुरुवात केली. हातात नोकरी असताना अभिनयाची आवड मात्र त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. अशातच त्याने मॉडेलिंगपासून सुरुवात केली आणि पुढे नाटकातून कामं करायला सुरुवात केली. अश्रुंची झाली फुले, कट्यार काळजात घुसली, लेकुरे उदंड जाहली या नाटकांमधून त्याने काम केलं. त्याला नवी ओळख मिळाली ती मालिकांमधील अभिनयामुळे. नाटक आणि मालिकांसोबतच सुबोधने अनेक मराठी चित्रपटांतून काम केलं. आज सुबोध सर्वांचा लाडका अभिनेता आहे.