Join us

Har Har Mahadev Box Office Report : हर हर महादेव! बॉलिवूड चित्रपटांना पछाडत सुबोध भावेच्या चित्रपटाने केली इतकी कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 10:45 AM

Har Har Mahadev Box Office Report : छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारित ‘हर हर महादेव’ चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर आपला दम दाखवला.

Har Har Mahadev Box Office Report : 25 ऑक्टोबरला बॉक्स ऑफिसवर फक्त ‘रामसेतू’ व ‘थँक गॉड’ हे दोन सिनेमेच रिलीज झाले नाही तर ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) हा सिनेमाही रिलीज झाला. अभिजीत देशपांडे यांनी दिग्दर्शित केलेला ‘हर हर महादेव’ मराठी सिनेमा आहे. पण हिंदी, तामिळ, कन्नडसह एकूण पाच भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रमी मावळे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारित या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर आपला दम दाखवला. पहिल्या दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. पहिल्या दिवशी या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 2.25 कोटींची कमाई केली. 

संपूर्ण भारतात एकूण 400 चित्रपटगृहांत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे एकूण 1200 यो दाखवण्यात आले. सध्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.पहिल्या दिवशी 2.25 कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी 1 कोटी 36 लाखांची कमाई केली. तर तिसऱ्या दिवशी 80 लाखांचा गल्ला जमवला.‘हर हर महादेव’ या चित्रपटात मराठमोळा अभिनेता सुबोध भावे याने  छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेता शरद केळकरने बाजीप्रभूंची भूमिका जिवंत केली आहे.

शिवरायांची भूमिका सुबोध अक्षरश: जगला. ‘स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा असं आपण नेहमी ऐकतो, वाचतो. त्याप्रमाणेच मी ही भूमिका साकारावी, ही माझी किंवा दिग्दर्शकाची नाही तर प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती असं मला वाटतं. बावीस वर्षांपूर्वी जेव्हा मी मुंबईत आलो होतो, स्ट्रगल करत होतो त्यावेळी एका मालिकेसाठी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी ऑडीशन दिली होती. त्यावेळी माझी निवड झाली नाही. महाराजांची ही भूमिका करण्यासाठी मला तब्बल २२ वर्षे वाट बघावी लागली. कदाचित महाराजांचीच ही इच्छा असेल की, मी माणूस म्हणून अजून प्रगल्भ व्हावं, अभिनेता म्हणून या भूमिकेसाठी अधिक तयार व्हावं, म्हणूनच एवढ्या कालावधीनंतर ही भूमिका माझ्याकडे आली. या भूमिकेला मी पूर्णपणे समर्पणाची भावना दाखवली म्हणूनच ती साकारणं शक्य झालं,’ असं सुबोध म्हणाला.

टॅग्स :सुबोध भावे शरद केळकरसिनेमामराठी अभिनेता