Join us

यशाची गोडी चाखायलाच हवी-श्रेयस तळपदे

By अबोली कुलकर्णी | Published: November 02, 2018 4:33 PM

‘सावरखेड एक गाव’,‘पछाडलेला’,‘आईशप्पथ’ यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये अभिनेता श्रेयस तळपदे याने उत्कृष्ट भूमिका साकारलेल्या आहेत. आता श्रेयस डिजिटल प्लॅटफॉर्मवर एन्ट्री करत असून तो ‘बेबी कम ना’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.

अबोली कुलकर्णी

 ‘गोलमाल’सीरिज, ‘इकबाल’, ‘डोर’ यासारख्या अनेक हिंदी चित्रपटात आणि ‘सावरखेड एक गाव’,‘पछाडलेला’,‘आईशप्पथ’ यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये अभिनेता श्रेयस तळपदे याने उत्कृष्ट भूमिका साकारलेल्या आहेत. आता श्रेयस डिजिटल प्लॅटफॉर्मवर एन्ट्री करत असून तो ‘बेबी कम ना’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. त्याच्याशी यानिमित्ताने मारलेल्या गप्पा...

* अल्ट बालाजी वरील ‘बेबी कम ना’ या वेबसीरिजमध्ये तू आदित्यच्या भूमिकेत दिसत आहेस. काय सांगशील शोविषयी?- आत्तापर्यंत मराठी, हिंदी सिनेमात हा विषय बऱ्याच चित्रीत झालेला आहे. हा विषय जेव्हाही माध्यमांमध्ये आला तेव्हा तो प्रेक्षकांना नक्कीच आवडलेला आहे. ‘साजन चले ससुराल’,‘किस किस को प्यार करूँ’, ‘गरम मसाला’ असे अनेक चित्रपट  हिट झाले आहेत. एक मुलगा आणि दोन मुली असा या चित्रपटाचा मुख्य गाभा असतो. अशी भूमिका मी यापूर्वी कधीही केलेली नाही. मी माझ्या पद्धतीने  ही भूमिका करायचे ठरवले होते. अल्ट बालाजीचा प्लॅटफॉर्म असल्याने मी जास्त उत्सुक असतो. मजा आली शूटिंग करत असताना. खूप एन्जॉय केले आहे.

* आत्तापर्यंत तू कित्येक विनोदी भूमिका केल्या आहेस. मग ही भूमिका किती वेगळी? - भूमिकेसाठी तयारी अशी कुठली करावी लागली नाही. यापूर्वी मी पाहिलेली एखादी भूमिका मी माझ्या पद्धतीने कशी रंगवणार? यातच खरं आव्हान माझ्यासाठी होतं. त्या मुलींसोबत राहताना मला काय काय करावं लागतं हे पडद्यावर पाहणंच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. प्रत्येक रोल हा आव्हानात्मक असतो. मी तो माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो. 

* शोच्या टीमबद्दल आणि सेटवरच्या गमतीजमतींबद्दल जाणून घ्यायला आवडेल..-  आमची टीम खरंतर खूप मस्त आहे. माझ्यासोबत किकू शारदा, शेफाली जरीवाला आणि मानसी स्कॉट मुख्य भूमिकेत आहेत. त्यांनी कधीच यापूर्वी यातल्या व्यक्तिरेखा साकारल्या नव्हत्या. मात्र, पहिल्यांदाच  करूनही त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने केले आहे. काही दिवसांतच आमचे शूटिंग पूर्ण झाले. एकत्र काम करताना मजा आली.

* तू हिंदी-मराठी दोन्ही भाषांमध्ये काम केलं आहेस. कोणत्या भाषेत तू जास्त कम्फर्टेबल असतोस?- कलाकारांसाठी भाषेचे बंधन कधीच नसते. मी हिंदीत बरंच काम केलंय. मराठीत त्या तुलनेत कमी काम केले आहे. ‘भेट’,‘सावरखेड एक गाव’,‘पछाडलेला’ यासारख्या चित्रपटांमध्ये मी काम केलं आहे. मला प्रचंड शिकायला मिळालं.  महेश कोठारे, भरत जाधव या सारख्या दिग्गजांकडून मला जे शिकायला मिळालं ते मी इंडस्ट्रीत काम करताना अनुभव घेऊन पाहिला.

* चित्रपट, टेलिव्हिजन या प्रकारांत तू अभिनेता म्हणून काम केलंच आहेस. त्यासोबतच तू दिग्दर्शक म्हणूनही काम पाहिलं आहेस. कोणता फरक जाणवतो काम करताना?- मी असा विचार करत नाही. खरंतर प्लॅटफॉर्म कुठलाही असो, मी काम प्रामाणिकपणे करतो. मला आमच्या गुरूंनी शिकवलं आहे की, थिएटर करत असताना समोर एक व्यक्तीही बसलेला असला तरीही त्याला त्याच्या पैशांचा मोबदला मिळायला हवा असे काम केलेच पाहिजे. अभिनय क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला खूप चोख आणि प्रामाणिक असणं गरजेचं असतं.

* आत्तापर्यंतचा प्रवास एक अभिनेता म्हणून किती समृद्ध करणारा होता?- आत्तापर्यंतचा प्रवास खरंच खूप काही शिकवणारा होता. कारण प्रत्येक दिवशी मी काहीतरी नवीन शिकत असतो. एखादा चित्रपट अपयशी ठरला तर आपण खूप मेहनत केली पण, प्रेक्षकांना तो आवडला नाही, तर नक्कीच खूप नाराज व्हायला होतं. पण, या प्रवासात नवीन गोष्टी शिकायला मिळतात. 

टॅग्स :श्रेयस तळपदेशेफाली जरीवालाकिकू शारदा