Join us

प्रकाश मगदूम यांना सुधीर नांदगावकर मेमोरियल पुरस्कार, 'स्थळ' सिनेमाने थर्ड आय फिल्म फेस्टिव्हलची सांगता

By संजय घावरे | Published: January 18, 2024 10:03 PM

3rd I Asian Film Festival : सिनेमाच्या बाबतीत सुधीर नांदगावकर खूप पॅशनेट होते. त्यांच्या कामातून त्यांची सिनेमाप्रती असलेली श्रद्धा जाणवायची. व्ही. शांतराम फाउंडेशन सोबतचा त्यांचा प्रवास खुप सुंदर होता. माझ्या 'द महात्मा ऑन सेल्युलॉइड' या पुस्तकासाठीही सुरुवातीला त्यांचे मार्गदर्शन लाभले होते अशी भावना लेखक प्रकाश मगदूम यांनी व्यक्त केली.

मुंबई - सिनेमाच्या बाबतीत सुधीर नांदगावकर खूप पॅशनेट होते. त्यांच्या कामातून त्यांची सिनेमाप्रती असलेली श्रद्धा जाणवायची. व्ही. शांतराम फाउंडेशन सोबतचा त्यांचा प्रवास खुप सुंदर होता. माझ्या 'द महात्मा ऑन सेल्युलॉइड' या पुस्तकासाठीही सुरुवातीला त्यांचे मार्गदर्शन लाभले होते अशी भावना लेखक प्रकाश मगदूम यांनी व्यक्त केली. २०व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हलच्या सांगता समारंभात सुधीर नांदगावकर मेमोरियल पुरस्काराने गौरविण्यात आल्यानंतर मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.

मागील सात दिवसांपासून सुरू असलेल्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हलचा समारोप सोहळा माहिमधील सिटीलाईट सिनेमागृहात संपन्न झाला. यात जयंत सोमाळकर दिग्दर्शित 'स्थळ' या मराठी सिनेमाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. 'गाभ' चित्रपटासाठी कैलाश वाघमारेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर 'स्थळ'साठी नंदिनी चिकटेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. मोनीर घेयदी दिग्दर्शित 'स्कॉड ऑफ गर्ल्स' या ईराणी सिनेमाने स्पेशल मेन्शन पुरस्कार पटकावला. इंडियन कॉम्पिटिशनमध्ये 'फॅमिली' सिनेमा सर्वोत्कृष्ट ठरला, तर 'आत्मपॅम्फ्लेट'साठी दिग्दर्शक आशिष बेंडेला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. 'या गोष्टीला नावच नाही'साठी जयदीप कोडोलीकरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर 'बिजॉयर पोरे'साठी ममता शंकर यांना आणि 'पेकामेडालू'साठी अनुषा कृष्णा यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार विभागून देण्यात आला. 

या सोहळ्याला एशियन फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष किरण शांताराम, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव तथा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महोत्सवाचे संचालक संतोष पाठारे, दिग्दर्शक सुनील सुकथनकर, ज्युरी आणि दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग, महोत्सवाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप मांजरेकर, विश्वस्त श्रीकांत बोजेवार आदी मंडळी उपस्थित होती. यावेळी सुधीर नांदगावर मेमोरियल पुरस्काराने लेखक प्रकाश मगदूम यांचा सन्मान करण्यात आला. मगदूम यांनी लिहिलेले 'द महात्मा ऑन सेल्युलॉइड' हे पुस्तक चांगलेच गाजले आहे. थर्ड आयसारखे चित्रपट महोत्सव जाणकार रसिक घडवण्याचे काम करीत असल्याचेही मगदूम म्हणाले. 

यावेळी किरण शांताराम म्हणाले की, मागील सात दिवसांत ४०० पेक्षा डेलीगेट्सनी या महोत्सवाला भेट दिली आणि विविध धाटणीच्या सिनेमांचा आनंद लुटला. थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल २०२४ यंदा डिसेंबरमध्ये होणार असल्याचेही किरण शांताराम यांनी जाहीर केले. इंडोनेशियासह जगभरातील उत्कृष्ट सिनेमांसोबत या महोत्सवात सिनेमाशी निगडित असलेल्या विविध विषयांवर चर्चा झाल्याचे पाठारे म्हणाले. सोनाली कुलकर्णी, मधुर भांडारकर आणि चैतन्य शांताराम या तीन नवीन विश्वस्तांची यंदा निवड करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. सुनील सुकथनकर यांनी नांदगावकर यांची आठवण करत मराठी सिनेमात घडलेले बदल आणि विविध अंगांबाबत सांगितले. दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंगने फार कमी वयात महोत्सवाने ज्युरीची जबाबदारी टाकल्याने फिल्ममेकर म्हणून प्रगल्भ करणारा अनुभव गाठीशी आल्याचे सांगितले.

मनोरंजन विश्वाबाबतची राज्य सरकारची भूमिका विषद करत विकास खारगे म्हणाले की, महाराष्ट्र सरकार नेहमीच मराठी सिनेमांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आहे. महाराष्ट्रात खुप टॅलेंट असल्याने वेगवेगळ्या माध्यमांतून मनोरंजन विश्वाला सपोर्ट करत आहे. एकदा किरण शांताराम आले आणि अशा प्रकारच्या सिनेमा फेस्टिव्हल्सना मदत करण्याचे आवाहन केले. त्यावर दोन प्रेमळ अटींवर मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. या चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट दर्जाचे मराठी सिनेमे दाखवण्यात आल्याचेही खारगे म्हणाले.

टॅग्स :सिनेमामराठी चित्रपट