Join us

'बाईपण भारी देवा'ची क्रेझ, ८० वर्षांच्या आजीने सुकन्या मोनेंसोबत घातली फुगडी, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 09:52 IST

गुलाबी रंगाच्या नऊवारीत आजीबाई मस्त डान्स एन्जॉय करत आहेत. 

मराठी सिनेमा 'बाईपण भारी देवा'चा धुमाकूळ काही थांबत नाही. सिनेमा रिलीज होऊन काहीच दिवसात १ महिना होईल पण थिएटरमधली गर्दी कायम आहे. सहा बायकांनी घातलेला पिंगा बघण्यासाठी महिलांची थिएटरमध्ये गर्दी होत आहे. दिग्दर्शक केदार शिंदेंसह अभिनेत्री सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर यांनी नुकतेच कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतले. तसंच कोल्हापूरच्या एका थिएटरलाही भेट दिली. 

'बाईपण भारी देवा' च्या टायटल साँगचीही सध्या सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ आहे. अनेक बायका गाण्यांवर व्हिडिओ बनवत आहेत. बायकांचा उत्साह दिवसेंदिवस वाढतानाच दिसतोय. अगदी लहान मुलींपासून ते वृद्ध आजींपर्यंत सिनेमाचे चाहते आहेत. कोल्हापूरच्या थिएटरबाहेर एका आजीबाईंचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी त्या आजीबाईंसोबत ठेका धरलाय. दोघी अगदी फुगडीही घालताना दिसत आहेत.बरं या आजीबाईंचं वय ८० वर्ष आहे. याही वयात त्यांच्या उत्साहाला मात्र तोड नाहीए. गुलाबी रंगाच्या नऊवारीत आजीबाई मस्त डान्स एन्जॉय करत आहेत. 

असे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. सिनेमाने तब्बल 65 कोटींचा आकडा पार केला आहे. तर अद्यापही सिनेमाची कमाई सुरुच आहे. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, आणि दीपा परब या दिग्गज अभिनेत्रींनी चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रातून सिनेमाला खूप प्रेम मिळतंय. 

टॅग्स :सुकन्या कुलकर्णीमराठी चित्रपटमराठी अभिनेतासोशल मीडियाकोल्हापूर