Join us

सुमीत राघवनने चिडून फेसबुकला का टाकली ही पोस्ट, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 2:37 PM

सुमीतच्या नॉक नॉक सेलिब्रेटी या नाटकाच्या नाशिकमधील प्रयोगाच्यावेळी प्रेक्षकांचे मोबाईल सतत वाजत असल्याने तो कंटाळला होता आणि चिडून त्याने नाटक बंद केले.

ठळक मुद्देवेगवेगळ्या लोकांचा मोबाईल वाजला त्या प्रयोगाला. प्लस एका गृहस्थाने दरवाजा उघडून आत बाहेर केलं,तसं करण्याला अजिबात आक्षेप नाही पण ते दार दर वेळी आदळायचं आणि मोठा आवाज व्हायचा...

नाट्यगृहात प्रयोग करत असताना कलाकारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कधी नाट्यगृहात स्वच्छता नसते तर कधी एअर कंडिशनच खराब असतो. गेल्या काही वर्षांपासून तर प्रेक्षकांचा मोबाईल हा कलाकारांसाठी डोकेदुखी झाला आहे. अनेकवेळा प्रयोग सुरू असताना मोबाईल वाजतो, प्रेक्षक आपण नाट्यगृहात आहोत याची पर्वा न करता मोबाईलवर खुशालपणे बोलतात. तसेच मोबाईलवर बोलण्यासाठी अनेकवेळा नाट्यगृहाच्या बाहेर जातात. या सगळ्यामुळे कलाकारांचे लक्ष विचलित होते. 

कोणतेही नाटक सुरू व्हायच्या आधीच मोबाईल स्वीच ऑफ करा अशी विनंती नाटकाच्या मंडळींकडून केली जाते. पण याकडे लोक सर्रासपणे दुर्लक्ष करतात. या गोष्टीला कंटाळून आजवर अनेक कलाकारांनी नाटकाचा प्रयोग मध्येच बंद केलेला आहे. आता या मोबाईल फोनला कंटाळून सुमीत राघवनने फेसबुकला एक पोस्ट लिहिली आहे.

सुमीतच्या नॉक नॉक सेलिब्रेटी या नाटकाच्या नाशिकमधील प्रयोगाच्यावेळी प्रेक्षकांचे मोबाईल सतत वाजत असल्याने तो कंटाळला होता आणि चिडून त्याने नाटक बंद केले. याविषयी त्याने त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, वेगवेगळ्या लोकांचा मोबाईल वाजला त्या प्रयोगाला. प्लस एका गृहस्थाने दरवाजा उघडून आत बाहेर केलं,तसं करण्याला अजिबात आक्षेप नाही पण ते दार दर वेळी आदळायचं आणि मोठा आवाज व्हायचा, पुढे एक वयस्कर बाई दुसऱ्या बाईला "अहो हळू बोला" असं बोलली, त्यावर‌ ती बाई दाराच्या बाहेर जाऊन बोलू लागली आणि ते बोलणं स्टेजवर ऐकू येत होतं आणि शेवटी एका पहिल्या रांगेतील प्रेक्षकाचा फोन वाजला आणि मी चिडून नाटक बंद केलं.

नाशिकच्याच "एक शून्य तीन" नावाच्या नाटकाच्या एका प्रयोगाला फोन वाजला होता एका प्रेक्षकाचा. तर तो बोलू लागला फोन वर, मी आणि स्वानंदी टिकेकर स्टेजवर होतो. मी प्रयोग थांबवून त्या व्यक्तीकडे बघितलं तर त्याने हाताच्या इशाऱ्याने "तुमचं चालू द्या" असं केलं आणि मी स्तब्ध झालो. तिकिट काढलं म्हणजे तुम्ही विकत घेतलं का आम्हाला? का म्हणून करावं‌ आम्ही नाटक? हा अपमान करून घेण्याकरता? म्हणजे एकीकडे नाट्यगृहांची दुरावस्था आहेच, तशा बकाल नाट्यगृहात काम करा वर आता प्रेक्षकांकडून अप्रत्यक्षरित्या असा अपमान सहन करा.

टॅग्स :सुमीत राघवनस्वानंदी टिकेकर