सोशल मीडियावर दररोज असंख्य मीम्स व्हायरल होत असतात. यात आपल्याला आवडलेले काही मीम्स आपण स्टेटस किंवा अन्य ग्रुपमध्ये शेअरदेखील करत असतो. परंतु, हे मीम्स नेमके कसे तयार होतात, किंवा ते तयार करण्यासाठी कोण किती कष्ट घेतं याचा आपण कधी विचार केला आहे का? अर्थात नाही. परंतु, अनेकदा आपण जे मीम्स व्हायरल करतो ते चोरीचे सुद्धा असू शकतात. हो. हे खरं आहे. मीम्सचीदेखील चोरी होते आणि त्यामुळेच मेहनत घेऊन तयार करणाऱ्या मिमस्टर्सला त्याचं क्रेडिट मिळत नाही. म्हणूनच, मीम्सची नेमकी चोरी कशी होते हे मिमस्टर सुमित पाटीलकडून जाणून घेऊयात.
"सुरुवातीच्या काळात मीम्स हा प्रकार फारसा कुठे रुजला नव्हता. मात्र, तरीही मी मीम्ससोबत एखाद डबिंग करायचो आणि ते लोकांना आवडायचंही. सगळ्यात आधी मी टायटॅनिक चित्रपटातील मुख्य कलाकारांवर एक डबिंग केलं होतं. यात चित्रपटातील मुख्य कलाकार कोल्हापुरी मिसळविषयी बोलत होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान गाजला.पण, या व्हिडीओमध्ये फक्त माझा लोगो आणि आवाज असल्यामुळे तो नेमका कोणी केलाय हे स्पष्ट होत नव्हतं. त्यामुळे बऱ्याच जणांनी माझा लोगो हटवून तो व्हायरल केला," असं सुमित म्हणाला.
मुलगी झाली हो! स्मिता तांबेच्या घरी चिमुकलीचं आगमनपुढे तो म्हणतो, आधी मी करत असलेल्या व्हिडीओमध्ये फक्त माझा आवाज आणि लोगो असल्यामुळे काही जण माझा लोगो हटवून किंवा तो ब्लर करुन व्हायरल करायचे. बऱ्याचदा माझ्या अशा अनेक व्हिडीओंची चोरीदेखील झाली आहे. त्यामुळे मी केलेल्या मेहनतीचं मला क्रेडिट मिळालं नाही. तेव्हापासून मी माझ्या प्रत्येक व्हिडीओमध्ये स्वत: स्क्रीनवर दिसायला लागलो. मुळात अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना मी अभिनय करु लागलो.
दरम्यान, सुमित सध्या भाडिपाच्या कोथरुड वर्सेस कोल्हापूर या नव्या सेगमेंटमध्ये झळकत आहे. पहिल्यांदाच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारा सुमित एक उत्तम मिमस्टर असून त्याचे असंख्य व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.