Join us

सुमीत राघवनला 'हॅम्लेट' नाटकाच्या प्रयोगावेळी मिळाले बेस्ट गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 11:11 AM

झी मराठीची पहिली नाट्य प्रस्तुती 'हॅम्लेट' हे मराठी नाटक गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आले.

झी मराठीची पहिली नाट्य प्रस्तुती 'हॅम्लेट' हे मराठी नाटक गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आले. या नाटकाचा नुकताच पार पडलेल्या एका प्रयोगाला बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने हजेरी लावली होती. यावेळी तिच्यासोबत तिचा नवरा श्रीराम नेनेदेखील उपस्थित होते. त्या दोघांनी प्रयोग पाहिला आणि त्यांना हे नाटक खूप आवडले. त्यानंतर त्यांनी या नाटकातील कलाकारांसोबत छान फोटोसेशनही केले.

सुमीत राघवनचा वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर म्हणजे २१ एप्रिलला मुंबईतल्या रविंद्र नाट्य मंदिरात हा प्रयोग पार पडला होता. त्यामुळे सुमीतला वाढदिवसाच्या आधी खूप छान गिफ्ट मिळाल्यामुळे त्याचा आनंद द्विगुणित झाला होता.

याबाबत सुमीत राघवन म्हणाला की, “खरेतर काय बोलू कळत नाही. कारण गेले अनेक दिवस मी माधुरीला प्रयोगाला येण्याचे आमंत्रण देत होतो, पण ‘टोटल धमाल’ आणि ‘कलंक’मध्ये ती फारच बिझी होती. या प्रयोगाचा सुद्धा मी नेहमीप्रमाणे मॅसेज तिला पाठवला आणि मला तिच्या मॅनेजरचा फोन आला की ती प्रयोगाला येणार आहे, मी खूपच खूश झालो. माझ्या वाढदिवसाअगोदर हे असे होणे म्हणजे माझ्यासाठी एक बेस्ट गिफ्ट होते असेच म्हणेन मी.”

‘बकेट लिस्ट’ या माधुरी दीक्षितच्या पहिल्या वहिल्या मराठी चित्रपटात सुमीतने माधुरीच्या पतीची भूमिका साकारली होती. त्यावेळी चित्रीकरणादरम्यान या दोघांची चांगलीच गट्टी जमली. ही मैत्री आजही कायम ठेवत माधुरीने सुमीतच्या नाटकाला हजेरी लावली आणि त्याच्यासाठी हे क्षण खास होऊन गेले. 

टॅग्स :सुमीत राघवनमाधुरी दिक्षित