Join us

‘लगी तो छगी’मधून सुरेंद्र पाल यांच मराठीत पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 6:12 AM

मराठीचा झेंडा आज जगभरात डौलाने फडकतोय. केवळ जगभरातील प्रेक्षकांनाच नव्हे, तर अन्य भाषिक कलाकारांनाही मराठी सिनेसृष्टीचं आकर्षण निर्माण झालं आहे. ...

मराठीचा झेंडा आज जगभरात डौलाने फडकतोय. केवळ जगभरातील प्रेक्षकांनाच नव्हे, तर अन्य भाषिक कलाकारांनाही मराठी सिनेसृष्टीचं आकर्षण निर्माण झालं आहे. यामुळेच भारतीय सिनेसृष्टीतील काही बडे कलाकार थेट मराठी सिनेमात अभिनय करून आपली हौस भागवत आहेत, तर काही निर्मितीच्या माध्यमातून मराठी रसिकांची सेवा करण्यात दंग आहेत. अशातच हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेले अभिनेते सुरेंद्र पाल यांनीही मराठी सिनेमात एंट्री केली आहे. शिवदर्शन साबळेंच्या 8 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या ‘लगी तो छगी’ या चित्रपटात ते महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.आज सुरेंद्र पाल यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. आपल्या अनोख्या अभिनयशैलीच्या बळावर भारतीय सिनेसृष्टीत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बी. आर. चोप्रांच्या‘महाभारत’ या मालिकेतील सुरेंद्र पाल यांनी साकारलेले द्रोणाचार्य कायम स्मरणात राहणारे आहेत. याशिवाय ‘चाणक्य’, ‘शक्तिमान’, ‘देवों के देव महादेव’ या मालिकांसोबतच ‘खुदा गवाह’, ‘जोधा अकबर’, ‘एअरलिफ्ट’, ‘तमस’, ‘लक्ष्य’ या सिनेमांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिकाही लक्षवेधी ठरल्या आहेत. आता दिग्दर्शक शिवदर्शन साबळे यांच्या ‘लगी तो छगी’ या आगामी मराठी सिनेमात पाल महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. शिवदर्शन यांनी दिप्ती विचारे, स्वाती फडतरे आणि अजित पाटील यांच्या साथीने लगी तो छगी या सिनेमाची निर्मिती केली आहे. कॉमेडी-सस्पेन्स-थ्रीलर पठडीत मोडणाNया या सिनेमात सुरेंद्र पाल पठाणची व्यक्तिरेखा साकारीत आहेत. मराठी सिनेमात काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद त्यांच्या बोलण्यातून जाणवल्याशिवाय राहात नाही. या सिनेमाविषयी बोलताना पाल म्हणाले की गोष्ट हा मराठी सिनेमांचा यूएसपी आहे, त्यामुळे मराठीत काम करण्याची इच्छा होतीच ती ‘लगी तो छगी’च्या निमित्ताने पूर्ण झाली. या सिनेमाची कथा उत्कंठावर्धक असून त्यातील माझ्या वाटयाला आलेली व्यक्तिरेखाही लक्ष वेधून घेणारी आहे. शिवदर्शन साबळे हे दूरदृष्टी असलेले दिग्दर्शक असल्याने त्यांच्यासोबत काम करताना एक वेगळाच आनंद लाभल्याचंही पाल म्हणाले. या सिनेमाचं कथानक वर्तमान काळातील असून सद्य परिस्थिततीवर भाष्य करणारं आहे. या सिनेमाच्या कथेतील रहस्य विनोदी अंगने उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या सिनेमांमध्ये व्यक्तिरेखेला साजेशा कलाकारांची आवश्यकता असल्यानेच सुरेंद्र पाल यांच्यासारख्या तगडया अभिनेत्याची निवड करण्यात आल्याचं शिवदर्शन यांचं म्हणणं आहे. पाल यांनी आजवर बऱ्याच व्यक्तिरेखा सजीव केल्या आहेत. ‘लगी तो छगी’ या सिनेमात ते पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.या चित्रपटामध्ये अभिजीत साटम, निकीता गिरीधर, रविंदर सिंग बक्षी, मिलिंद उके, योगेश सोमण, असित रेडीज, शैला काणेकर, राजू बावडेकर, सागर आठलेकर, महेश सुभेदार, अक्षय भोसलेआणि सुरेंदर पाल आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. पद्मश्री शाहिर साबळे यांचे चिरंजीव आणि शिवदर्शनचे वडील देवदत्त साबळे यांनी 40 वर्षांपूर्वा लिहिलेलं गीत या सिनेमात ऐकायला मिळणार आहे. या सिनेमाची कथा शिवदर्शनने भाऊ हेमराज साबळेच्या साथीने लिहिली आहेत. मुंबई-पुण्यासह गोव्यातील विविध लोकेशन्सवर चित्रीत करण्यात आलेल्या या चित्रपटाचे छायांकन केमेरामन प्रदिप खानविलकर यांनी केलं आहे. मंगेश कांगणे यांनी लिहिलेलं या सिनेमातील एक गीतही रसिकांना मोहिनी घालणारं आहे. सचिन लोव्हलेकर यांनी कॉस्च्युम डिझायनिंगची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली असून संकलनाचं काम अपूर्वा मोतीवाले-सहाय आणि आशिष म्हात्रे यांनी पाहिलं आहे.