Sushant Shelar : अभिनेता सुशांत शेलार एक उत्कृष्ट अभिनेता आहे. अभिनयसह सुशांत राजकारणात देखील सक्रिय आहे. अनेक कलाकारांसाठी आणि पडद्यामागच्या कलाकारांसाठी सुशांत काम करतो. अलिकडेच जेव्हा भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्याशी थेट अभिनेत्री प्राजक्ता माळीचा संबंध जोडला होता, तेव्हा सुशांत शेलार याने पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला होता. आता नुकतंच सुशांतने प्राजक्ता माळी प्रकरणावर भाष्य केलं. या संपुर्ण प्रकरणात प्राजक्ता माळीने तिची बाजू मांडली, पण धनंजय मुंडे काहीच का बोलले नाहीत? याचाही त्याने खुलासा केला.
सुशांत शेलारने नुकतीच इट्स मज्जाला मुलाखत दिली होती. यावेळी त्यानं प्राजक्ता माळीने जशी आपली बाजू स्पष्ट केली आहे. त्याप्रकारे या संपुर्ण प्रकरणात धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया का दिली नाही? यावर उत्तर दिलं. तो म्हणाला, "आताची जी राजकीय परिस्थिती आहे. त्यापेक्षा खूप मोठा विषय मार्गी लागणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. प्राजक्ता माळीची बाजू आम्ही कलाकार व तिचे सहकलाकार म्हणून घेतली. तसंच बीडमधील संतोष देशमुखांचा प्रश्न मार्गी लागणेही महत्त्वाचे आहे"
पुढे तो म्हणाला, "माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा प्रश्न तडीस लागेल. त्यामुळे मंत्री महोदय म्हणून धनंजय मुंडे त्या गोष्टी लवकर झाल्या पाहिजेत, याकडे लक्ष देत आहेत. आम्ही कलाकार या विषयाबद्दल आमची भूमिका घेत आहोत. त्या देशमुखांना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणं जास्त महत्त्वाचं आहे".
दरम्यान, प्राजक्ता माळी आणि सुरेश धस यांच्यातील वाद निवळला आहे. धस यांनी माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याच्या हेतूने भाष्य केल्याचा आरोप करत प्राजक्ता माळी हिने धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. तसंच याप्रकरणी तिनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेटही घेतली होती. प्राजक्ता माळीने घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर विविध कलाकारांनीही दिला पाठिंबा दिला होता. विविध स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर अखेर सुरेश धस यांनी याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली होती.
सुशांत शेलार सध्या राजकारणामुळे चर्चेत असतो. त्याचा अभिनयातला वावर कमी झाला असला तरीही राजकारणात मात्र बराच सक्रिय झाला आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. तो बरेचदा एकनाथ शिंदे यांचा प्रचार करताना सुद्धा दिसला आहे. याशिवाय तो शिव चित्रपट सेनेचा अध्यक्ष आहे.