Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभर खळबळ उडाली आहे. देशाच्या अनेक भागातून आलेल्या पर्यटकांवर या भागात दहशतवाद्यांच्या एका गटानं अंदाधुंद गोळीबार केला. त्यामध्ये आत्तापर्यंत २५ हून अधिक पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा भारतासह जगभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पहलगाम हल्ल्यावर आता विविध स्तरांतून प्रतिक्रिया येत आहेत. मराठी कलाकारांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेता सुव्रत जोशीने या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना एक पोस्ट लिहिली आहे.
सुव्रत जोशीने पोस्ट शेअर केली. त्यानं लिहलं, "काश्मीरमधून आलेली बातमी ही अत्यंत क्लेशदायक आहे! इस्त्राइलपासून ते काश्मीरपर्यंत जगभरात विविध धर्मातील धर्मांध लोकांनी मांडलेला उच्छाद… सर्व मजहब, Religion आणि धर्म वगैरे एकत्र बुडवून एकदाचा संपवावा… कारण, एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्याची ही तृष्णा कधीही न संपणारी आहे. त्यात स्वत:ला त्या धर्मातील मानणाऱ्या सूज्ञ वगैरे म्हणवणाऱ्या लोकांची अलिप्तता किंवा मूक पाठिंबा हा अधिक घातक आहे. अरुण कोल्हटकरांच्या 'शेवटचा अश्रू' या कवितेचीच आठवण होत आहे", असं म्हणत सुव्रतने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सुव्रत जोशीसोबतच अभिनेत्री सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, सौरभ गोखले, प्राजक्ता माळी, आरोह वेलणकर, प्रसाद ओक या कलाकारांनीदेखील हल्ल्याचा निषेध करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. दरम्यानपहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यादरम्यानचे अंगावर काटे आणणारे फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावं आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्याची माहिती आहे. टीआरएफ या दहशतवादी संघटनेने या भ्याड हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय. पर्यटकांवर झालेल्या गोळीबारानंतर काश्मीरमधील पर्यटक पुन्हा आपापल्या राज्यांमध्ये परतू लागले आहेत.