'दिल दोस्ती दुनियादारी' ही मालिका रसिकांच्या मनात घर करून आहे. यातील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांचं तुफान मनोरंजन करणारी ठरली. तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या मालिकेतील हे कलाकारही तसेच, तरुण आणि बिनधास्त. त्यामुळे या सगळ्या कलाकारांना रसिकांनी डोक्यावर घेतलं. या मालिकेतील एक पात्र म्हणजे सुजय साठे. अभिनेता सुव्रत जोशीने साकारलेला सुजय रसिकांना चांगलाच भावला. उत्तम अभिनेता असणारा सुव्रत या मालिकेनंतर दिल दोस्ती दोबारा आणि काही रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करतानाही दिसला. याशिवाय रंगभूमी आणि सिनेमातही त्याने आपल्या अभिनयाची जादू दाखवली. सध्या सुव्रतची भूमिका असलेले अमर फोटो स्टुडिओ हे नाडक रंगभूमीवर गाजत आहे. यातील त्याची भूमिकाही नाट्यरसिकांना भावते आहे. सध्या पुण्यात या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. सुव्रत लवकरच आणखी एका नव्या नाटकातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. सुव्रतने सोशल मीडियाच्या माध्यातून रसिकांना ही माहिती दिली आहे. या नाटकाच्या फोटो त्याने शेअर केला आहे. त्याच्या या आगामी नाटकाचे नाव 'शाही पहारेदार' असं आहे. नाटकाच्या शीर्षकाशिवाय अन्य कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र शीर्षकावरून हे नाटक नक्कीच रंजक असणार यांत शंका नाही. त्यामुळे नाट्य रसिकांनाही सुव्रतच्या या नाटकाची नक्कीच उत्सुकता असेल.
रंगभूमीवर नाट्य रसिकांच्या पसंतीस पात्र ठरलेलं नाटक म्हणजे ‘अमर फोटो स्टुडिओ’. सर्वसामान्यांसह तरुणाईला नाट्यगृहाकडे आकर्षित करण्यात हे नाटक यशस्वी ठरलं. तरुणाईला भावणाऱ्या या नाटकाचे दोनशेहून अधिक यशस्वी प्रयोग झाले आहेत. अमेय वाघ, सुव्रत जोशी, सिद्धेश पूरकर, पर्ण पेठे आणि पूजा ठोंबरे अशी तगडी स्टारकास्ट या नाटकातून रसिकांचं मनोरंजन करत आहे. कलाकारखाना' आणि 'सुबक' नाट्य संस्थेला सामाजिक जबाबदारीचे तितकेच भान आहे आणि म्हणूनच 'अमर फोटो स्टुडिओ'ने त्यांच्या नाटकांचे ठाणे आणि बोरिवली मधील प्रयोग हे महापुरामुळे बाधित झालेल्या केरळमधील जनतेला मदत करण्यासाठी आयोजित केले होते. "'Chief Minister Relief Fund' for Kerala" योजनेचा आपण ही एक भाग व्हावे आणि त्याचबरोबर या चांगल्या मोहिमेत आपला सहभाग असावा म्हणून या दोन प्रयोगांच्या उत्पन्नात थोडी भर घालून एक लाख एक हजार एक रुपयांची आर्थिक मदत योजनेसाठी मुख्यमंत्री यांना देऊ केली. अमर फोटो स्टुडिओ टीमने मुख्यमंत्र्यांची नुकतीच मंत्रालयात भेट घेतली.