सुव्रत जोशी हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून तो घराघरात पोहोचला. त्यानंतर अनेक मराठी सिनेमांमध्ये सुव्रत महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. अभिनयाबरोबरच सुव्रत त्याच्या बेधडक व्यक्तिमत्वासाठीही ओळखला जातो. सु्व्रत समाजातील न पटणाऱ्या आणि चुकीच्या गोष्टींबद्दल बिनधास्तपणे त्याचं मत मांडताना दिसतो. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने राजकीय नेत्यांबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
या मुलाखतीत त्याने अगदी स्पष्टपणे अनेक मुद्द्यांवर त्याची मतं मांडली. संपूर्ण स्वराज या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सुव्रत म्हणाला, "नैतिकतेची व्याख्या आपण खूप मर्यादित ठेवली आहे. एखाद्या महिलेने कसे कपडे घातले आहेत आणि तिचं शरीर किती दिसत आहे. यावरच आपली नैतिकता अवलंबून आहे. राजकीय नेते आश्वासन देतात आणि विसरून जातात. पण, तरीही ते नैतिक आहेत. ते अनैतिक नाहीत. पण, एखाद्या महिलेने कमी कपडे घातले तर ते अनैतिक आहे. पण, आमच्या घरी या गोष्टी नाहीत. कधीच नव्हत्या. 'टायटॅनिक'सारखे चित्रपट आम्ही घरी पाहायचो. त्याकाळी बँडिट क्वीन हा सिनेमा आला होता. मी तेव्हा लहान होता. वडिलांनी थिएटर मालकाला विनंती करून हा सिनेमा मला पाहायला दिला होता. त्यामुळे माझी समाजाबद्दलची मतं बदलली."
"आपण काय करतोय, देशात काय चाललंय याचा जनतेला आता विचार करण्याची गरज आहे. लोक अभिनेत्यांना ट्रोल करण्याआधी जराही विचार करत नाहीत. कुणाचंही ट्रोलिंग होणं वाईटच आहे. राजकीय नेत्यांचं, त्यांच्या कामाचं ट्रोलिंग व्हावं असं मला म्हणायचं नाही. पण, ते काय काम करत आहेत, याबद्दल बोललं गेलं पाहिजे. आपण त्यांचं प्रशिक्षण केलं पाहिजे. लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवून निवडून दिलं आहे. हा आपल्यात अप्रत्यक्षरित्या झालेला एक करार आहे. नेते लोकांबद्दल बोलतात पण विचार फक्त स्वत:चा विचार करत आहेत," असंही पुढे सुव्रत म्हणाला.