स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट ‘मोगरा फुलला’ जूनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटांमध्ये स्वप्नील जोशी याच्याबरोबर साई शक्ती आनंद, नीना कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, संदीप पाठक, सुहिता थत्ते, आनंद इंगळे, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, विक्रम गायकवाड, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत. ‘मोगरा फुलला’ १४ जून प्रदर्शित होणार आहे.
प्रख्यात दिग्दर्शिका श्रावणी देवधर ह्या बऱ्याच वर्षांनी ‘मोगरा फुलला’च्या माध्यमातून दिग्दर्शनाकडे परत वळल्या आहेत. त्यांनी याआधी अनेक गाजलेले चित्रपट दिग्दर्शित केले होते. त्यांमध्ये लपंडाव, सरकारनामा, लेकरू या मराठी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांना फिल्मफेअर आणि स्क्रीन यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. ‘मोगरा फुलला’ला स्वतःचा असा वेगळा टच देण्यास त्या सज्ज झाल्या आहेत.
“मोगरा फुलला’ या चित्रपटाच्या माध्यमातून मी बऱ्याच वर्षांनी दिग्दर्शनामध्ये पुनरागमन करत असल्याचा मला अत्यंत आनंद आहे. ही आगळ्या पद्धतीने गुंफलेली अशी प्रेमकथा आहे. कौटुंबिक समस्यांमध्ये गुंतलेल्या एका मुलाभोवती ही कथा फिरते. त्याच्या या समस्यांमुळे त्याच्या लक्षातही येत नाही की, आपले लग्नाचे वय उलटून गेले आहे. एके दिवशी तो अत्यंत खंबीर आणि स्वतंत्र विचाराच्या मुलीच्या प्रेमात पडतो. ती एका वेगळ्या वातावरणात वाढलेली मुलगी आहे. त्याच्याही लक्षात जेव्हा प्रेमाची ही बाब येते तेव्हा ही प्रेमकथा खूप पुढे सरकलेली असते,” असे उद्गार दिग्दर्शिका श्रावणी देवधर यांनी चित्रपटाच्या मुहूर्ताच्यावेळी काढले.
‘जीसिम्स’च्या अर्जुनसिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘जीसिम्स फिल्म्स’ने आतापर्यंत अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांत फुगे, तुला कळणार नाही, रणांगण या चित्रपटांचा समावेश आहे. ‘भिकारी’ चित्रपटाची प्रस्तुती कंपनीने केली होती. हा महाराष्ट्रातील एक आघाडीचा स्टुडिओ असून चित्रपट निर्मिती आणि प्रस्तुती, टेलिव्हिजन निर्मिती, प्रतिभा व्यवस्थापन, चित्रपट विपणन आणि प्रसार तसेच सॅटेलाइट संयोजन या क्षेत्रांमधील हे एक आघाडीचे नाव आहे.
“मोगरा फुलला’ची निर्मिती करत असल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. या चित्रपटाची कथा मराठी प्रेक्षकांना नक्कीच भावेल. श्रावणी देवधर यांच्याबरोबर काम करत असल्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे, कारण त्या एक अत्यंत प्रतिभावान आणि मेहनती अशा दिग्दर्शिका आहेत. त्यांनी सचिन मोटे यांच्याबरोबर चित्रपटाच्या कथेवर गेले वर्षभर खूप काम केले आहे,” असे उद्गार अर्जुनसिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांनी काढले.
ते पुढे म्हणतात, ‘जीसीम्स’ (ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट अँड मिडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड)च्या वृद्धीकथेमध्ये स्वप्निल जोशी यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्याबरोबर त्यांची मुख्य भूमिका असलेला आणखी एक चित्रपट करत असल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. ‘जिसिम्स’ने वेगळे चित्रपट करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. वेगळी कथा आणि वेगळ्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून आकर्षक असा चित्रपट तयार करण्यावर कंपनीचा भर असतो. आम्हाला पूर्ण खात्री आहे की ‘मोगरा फुलला’ हा चित्रपट आमच्या इतर चित्रपटांप्रमाणेच प्रेक्षकांची वाहवा मिळवेल.”
भारतीय चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपन्यांमधील एक अग्रणी कंपनी असलेल्या ‘पॅनोरमा स्टुडिओज’ने ‘मोगरा फुलला’च्या वितरणाची जबाबदारी घेतली आहे. पॅनोरमा स्टुडिओजनी रेड, दृश्यम, प्यार का पंचनामा-2, सत्यमेव जयते, वीरे की वेडिंग, मस्तीजादे, गब्बर इज बॅक (परदेशात), दिल तो बच्चा है जी अशा अनेक चित्रपटांची निर्मिती आणि वितरण केले आहे.