पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ची सध्या बातम्यांमध्ये चर्चा आहे. यामध्ये भारताचे खेळाडू कोणत्या खेळात कोणतं पदक जिंकतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. अशातच भारताला आणि विशेषतः महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी गोष्ट घडली. ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळे याने कांस्य पदक मिळवत इतिहास रचला. या आधी महाराष्ट्राला वैयक्तिक पदक १९५२ मध्ये खाशाबा जाधव यांच्या रुपाने मिळाले होते. यानंतर तब्बल ७२ वर्षांनी स्वप्नीलने पुन्हा एकदा पदक मिळवत देशासह कोल्हापूरचे नाव उंचावले. स्वप्नीलविषयी मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय लेखक-दिग्दर्शक क्षितीज पटवर्धनने खास पोस्ट लिहिली आहे.
क्षितीज पटवर्धनची स्वप्नील कुसळेबद्दल खास पोस्ट
क्षितीजने स्वप्नीलचा फोटो पोस्ट करुन लिहिलंय की, "स्वप्नीलने ऑलिम्पिक मेडल जिंकून फक्त इतिहास घडवला नाहीये, तर भविष्यासाठी खूप मोठी प्रेरणा दिली आहे. तुझ्या मेहनतीला, प्रवासाला आणि यशाला सलाम!!! या ऐतिहासिक कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाने त्याचा यथोचित सन्मान करावा!!" अशी मोजक्या शब्दात खास पोस्ट लिहून क्षितीजने स्वप्नील कुसळेची पाठ थोपटली आहे.
मुख्यमंत्री शिंदेंनी केली मदत जाहीर
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरे पदक मिळवून देणाऱ्या महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडीओ कॉन्स्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी स्वप्निलला राज्य सरकारकडून १ कोटीचे बक्षिस जाहीर केले. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दोघांनीही स्वप्नीलच्या प्रशिक्षकांशी संवाद साधला आणि त्यांचेही अभिनंदन केले. अशाप्रकारे संपूर्ण देशाकडून आणि विशेषतः महाराष्ट्राकडून स्वप्नील कुसळेचं अभिनंदन होतंय.