'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटाची सध्या सर्वांना खुप उत्सुकता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या छोट्या छोट्या क्लिप्स व्हायरल होत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून ग.दि.माडगुळकर, सुधीर फडके, राजा परांजपे या दिग्गज कलाकारांच्या असामान्य प्रतिभेला पाहता येणार आहे. अशातच काल राज ठाकरेंच्या हस्ते 'स्वरगंधर्व सुधीर फडके'चा हृदयस्पर्शी ट्रेलर लॉंच करण्यात आला.
'स्वरगंधर्व सुधीर फडके' ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं की, सुधीर फडके संगीताच्या ध्यासाने मुंबईत आले. पण सुरुवातीला प्रचंड संघर्ष त्यांच्या वाट्याला आला. अगदी मुंबई सोड, असंही त्यांना काहीजण म्हणाले. पुढे सुधीरजी चिकाटीने काम करत राहिले. आणि प्रभात फिल्म कंपनीमध्ये संगीतकार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात हेगडेवार यांचं सुधीर फडके यांना मार्गदर्शन मिळालं.
हळूहळू सुधीर फडके यांना त्यांच्या गाण्यातून लोकप्रियता मिळत गेली. आणि मग ग.दि.माडगुळकर यांच्या साथीने सुधीर फडके यांनी रचलेल्या गीत रामायणाची निर्मिती झाली. साधारण २ मिनिटांचा हा ट्रेलर हृदयस्पर्शी आहे. ट्रेलरमध्ये एका प्रसंगात वीर सावरकरांची झलकही दिसते. याशिवाय आशा भोसलेंच्या गाण्याचा छोटा अंश पाहायला मिळतो. 'स्वरगंधर्व सुधीर फडके' सिनेमा १ मे २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.