मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी (Swwapnil Joshi) अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. बालवयातच त्याने अभिनयाला सुरुवात केली. मराठीतला चॉकलेट हिरो अशीही त्याला मधल्या काळात ओळख मिळाली. नुकतेच त्याचे 'चिकी चिकी बुबूम बूम','जिलबी' हे सिनेमे रिलीज झाले. तो आता अभिनेताच नाही तर निर्माता म्हणूनही प्रेक्षकांच्या समोर आला आहे. याशिवाय तो गुजराती सिनेमाही करत आहे. मराठी इंडस्ट्रीच्या सध्याच्या परिस्थितीवर त्याने नुकतंच भाष्य केलं आहे. तसंच येत्या दशकातलं इंडस्ट्रीचं भविष्यही सांगितलं आहे.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत स्वप्नील जोशी म्हणाला, "मला वाटतं जितकं लोकल गोष्ट सांगू तितकं ते ग्लोबल होतं. आपल्या भागाशी आणि माणसांशी जोडलेल्या गोष्टी प्रेक्षकांना जास्त भावतात. जमिनीशी जोडलेल्या गोष्टी ज्यांच्याशी ते कनेक्ट करु शकतील त्याच गोष्टी आज प्रेक्षकांना ऐकायच्या आहेत, पाहायच्या आहेत."
मराठी इंडस्ट्रीबद्दल स्वप्नील म्हणाला, "मला वाटतं मराठी सिनेमा स्क्रीप्ट, बजेट आणि उत्पन्नाच्या बाबतीत योग्य निर्णय घेत आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीची तुलना साऊथशी करणं हे चुकीचं आहे. तुम्ही सफरचंद आणि संत्र्यांची तुलना करत नाही. मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की मराठी इंडस्ट्री आज त्या ठिकाणी पोहोचली आहे जिथे साऊथ इंडस्ट्री १०-१५ वर्षांपूर्वी होती. तेही संघर्ष करत होते, स्पर्धेत राहण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना आपल्या सारख्याच अडचणी येत होत्या. पण त्यावर त्यांनी मात केली आणि आज बघा ते कुठे पोहोचले आहेत. मराठी इंडस्ट्रीही त्यांच्या पावलावर पाऊल टाकेल अशी मला आशा आहे. मला वाटतं येणारं दशक हे मराठी इंडस्ट्रीसाठी खूप महत्वाचं असेल. पॅन इंडिया फिल्म्स बनवून आपणही काळाच्या कसोटीवर नक्की खरे उतरु."