Join us

'टकाटक' जोडी प्रथमेश परब आणि रितिका श्रोत्री आता दिसणार 'डार्लिंग'मध्ये, येणार या दिवशी भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2021 1:17 PM

मराठीतील बहुचर्चित चित्रपट असलेल्या 'डार्लिंग' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर आता चित्रपटगृहे खुली होत असल्याची बातमी येताच आगामी चित्रपट प्रदर्शित करण्याची लगबग सुरू झाली आहे. मागील वर्षभरापासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा एका मागोमाग एक घोषित केल्या जात आहेत. मराठीतील बहुचर्चित चित्रपट असलेल्या 'डार्लिंग' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. सेव्हन हॉर्स एंटरटेनमेंट प्रा. लि., व्ही. पतके फिल्म्स आणि कथाकार मोशन पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत निर्माते अमित धुपे, अजय ठाकूर, व्ही. जे. शलाका आणि निखील खजिनदार यांची निर्मिती असलेला 'डार्लिंग' १० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. 

 'डार्लिंग' हा चित्रपट घोषणेपासून चर्चेचा विषय ठरला आहे. समीर आशा पाटील यांनी 'डार्लिंग'चे दिग्दर्शन केले आहे. समीर यांनी आजवर नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळे विषय हाताळत मराठीच्या कक्षा रुंदावणाऱ्या चित्रपटांचे आपल्या अनोख्या शैलीत दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे अर्थातच 'डार्लिंग'कडून सर्वांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत.

लॉकडाऊनमुळे लांबणीवर गेलेल्या 'डार्लिंग'च्या ट्रेलरलाही प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद लाभला आहे. या चित्रपटातील 'डार्लिंग तू...' हे टायटल साँग असो वा, 'ये है प्यार...' हे रोमँटिक साँग असो... गीत-संगीताच्या माध्यमातूनही 'डार्लिंग'ने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या चित्रपटात प्रथमेशची 'टकाटक'मधली जोडीदार रितीका श्रोत्री त्याची 'डार्लिंग' बनली आहे. या निमित्ताने प्रथमेश-रितीका ही जोडी पुन्हा एकदा रसिकांवर मोहिनी घालण्यासाठी सज्ज झाली आहे. या दोघांना 'लागिरं झालं जी' आणि 'कारभारी लयभारी' फेम निखिल चव्हाणची साथ लाभल्याचे चित्रपटात पहायला मिळणार आहे. 

या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच 'डार्लिंग'चं लेखनही समीर आशा पाटील यांनी केले आहे. या सिनेमात प्रथमेश-रितीका-निखिल यांच्यासोबत मंगेश कदम, आनंद इंगळे हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.  संगीतकार चिनार-महेश या संगीतकार जोडीनं या चित्रपटातील गीतांना स्वरसाज दिला आहे. या चित्रपटाचे रिलिजिंग पार्टनर पिकल एंटरटेनमेंटचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी असून, वितरणाची जबाबदारीही तेच सांभाळणार आहेत.

टॅग्स :प्रथमेश परबटकाटक