‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ या सिनेमा चुलत्या भूमिकेतून रसिकांचे लक्ष वेधून घेणारा कैलाश वाघमारे आता पुन्हा एकदा नवीन रंगात नव्या ढंगात चाहत्यांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. एका संगीत कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकताच त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत त्याने त्याच्या कार्यक्रमाचे स्वरुप सांगितले आहे. अल्पावधीतच कैलाशने आपल्या अभिनयाने रसिकांंची पसंती मिळवली आहे. त्यामुळे आगामी काळात तो आणखी काय काय धमाल करणार हे पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.
कैलाशने एकांकिका आणि नाटकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका करत असताना त्याच्याकडे ’शिवाजी अंडरग्राऊंड भीमनगर मोहल्ला’ हे नाटक आले. नाटकामध्ये एका कट्टर मावळ्याची भूमिका साकारायला मिळाली. या नाटकासाठी त्याने दोन वर्षे मेहनत केली. हे नाटक त्याच्या आयुष्यात कलाटणी देणारे ठरले.
प्रत्येक यशस्वी व्यक्तीने त्याने करिअरच्या सुरुवातीला संघर्ष केलेला असतो. जिद्द, मेहनत आणि अथक प्रयत्न यांच्या जोरावर अनेक संकटं तसंच अडचणींवर मात करत ती व्यक्ती यशशिखरावर पोहोचते. त्यामुळंच की काय प्रत्येक व्यक्तीसाठी करिअरच्या सुरुवातीचा काळ आठवणीत ठेवण्यासारखा असतो. अगदी कैलाशचाही संघर्ष हा सुरु आहे.कैलाशनं 'मनातल्या उन्हान' या मराठी सिनेमातून आपल्या सिनेकारकिर्दीची सुरुवात केली होती. जालना जिल्ह्यातील ’चांदई’ या छोट्याशा खेड्यातून बॉलिवूडपर्यंतचा त्याचा प्रवास हा नक्कीच प्रेरणादायी आहे.
त्याने अनेक लघुपटांमध्ये काम केले, तसेच विविध स्पर्धांमध्ये बाजी मारली. त्यानंतर त्याने मराठीमध्ये ’हाफ तिकीट’, ’ड्राय डे’, ’भिकारी’ अशा सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मात्र ’तान्हाजी’ सिनेमामुळे तो ख-या अर्थाने प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. या सिनेमामुळेच आज त्याची एक वेगळीच ओळख निर्माण होत आहे. चुलत्या ही भूमिका छोटी असली तरी कैलास वाघमारेने ती चोख निभावली होती.त्यामुळेच आपल्या अभिनयाच्या जोरावर अजय देवगण, सैफ अली खान, शरद केळकर, अजिंक्य देव आणि काजोल अशी तगडी स्टारकास्ट असतानाही त्याने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.