मराठमोळा अभिनेता कैलास वाघमारे याची नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. एक संवेदनशील अभिनेता आणि लेखक म्हणून तो ओळखला जातो. ‘तान्हाजी’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेचं अपार कौतुक झालं होतं. लवकरच त्याचा ‘गाभ’ हा मराठी सिनेमा प्रदर्शित होतोय. अभिनयाच्या दुनियेत कैलाशनं स्वत:च वेगळं स्थान निर्माण केलंय. अर्थात कैलाशसाठी हा प्रवास सहजसोपा नव्हता. सुरूवातीच्या काळात त्याला अनेक कटू अनुभव आलेत. एका ताज्या मुलाखतीत तो याबद्दलच बोलला. कैलाश वाघमारेला बघितल्याबरोबर लोक जज करायला लागतात, असं तो म्हणाला.
“भाषा तुमची तेव्हा कळते, जेव्हा तुम्ही तोंड उघडता. पण जेव्हा तोंड उघडण्याआधी तुम्हाला जज केलं जातं, तेव्हा काय करायचं?”, असा उद्विग्न प्रश्न त्याने यावेळी केला.
काय म्हणाला कैलाश? “ मी भाषेच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगू इच्छितो की, तुमची भाषा समोरच्या व्यक्तीला तेव्हाच कळते जेव्हा तुम्ही तुमचं तोंड उघडता. पण जेव्हा तोंड उघडण्याआधी तुम्हाला जज केलं जातं, तेव्हा त्याचं काय करायचं? कैलाश वाघमारेला बघितल्याबरोबर त्याला श्रेणीत विभागल्या जातं. हा कुठल्या तरी एका विशिष्ट जात समूहाचा असणार आहे किंवा हा गावाकडचा असणार आहे. याला काहीच येत नसणारं आहे, हे जे विशिष्ट श्रेणीत विभागजं जाण आहे आणि त्यानुसार तुम्हाला ट्रिट केलं जाणार आहे, इथून सुरू होतं,” असं तो म्हणाला.
“मला तर अनेकदा माझ्या दिसण्यावरुन हिणवलं गेलं. मी काही बोलण्यापूर्वी माझ्याबद्दल मत बनवण्यात आलं. पण याच परिस्थितीने मला तितक्यात हिंमतीने तोंड द्यायला शिकवलं. आता माझा अभिनय पाहिला की सर्वजण शांत होतात”, असंही तो म्हणाला.
कैलाशने ‘तान्हाजी’ चित्रपटात चुलत्याची भूमिका साकारली होती. या सिनेमाने कैलाशला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. हाफ तिकीट, भिरकिट भिकारी, मनातल्या उन्हात, ड्राय डे, खिसा, सायकल, मयत, भाऊ, हिरवी अशा चित्रपटात तो झळकला.