‘हॉर्न ओके प्लीज’च्या गाण्याच्या शूटवेळी नाना पाटेकर यांनी माझ्याशी गैरवर्तन केले, असा आरोप तनुश्री दत्ताने केला आहे. त्यानंतर सिनेसृष्टीतून कोणी तनुश्रीला पाठिंबा देत आहे तर कोणी टीका करत आहे. या प्रकरणावर अभिनेता जितेंद्र जोशी याने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, एक बाजू ऐकून कमेंट करणे चुकीचे ठरेल. त्यामुळे नानांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे.
जितेंद्र जोशी म्हणाला की, एक गोष्ट घडते त्यावर सगळेच जण प्रतिक्रिया देत सुटतात. तर्कवितर्क लावण्यापेक्षा दोघांची बाजू समजून घेतली पाहिजे. मी नानांच्या प्रतिक्रियेची वाट बघेन. त्यांची बाजू ऐकायला हवी. आपण एक बाजू ऐकून पटकन रिअॅक्ट होतो. त्यातले काय खरे काय खोटे हे माहित नसताना त्यावर आपले मत व्यक्त करणे चुकीचे आहे. नाना पाटेकर व तनुश्री दत्ता या दोघांचाही अपमान होता कामा नये. दुसऱ्याच्या आयुष्यावर शितोंडे उडविणे योग्य नाही. त्यामुळे नानांच्या प्रतिक्रियेची वाट पाहणे उचित ठरेल.
येत्या ८ आॅक्टोबरला नाना पाटेकर, गणेश आचार्य, सामी सिद्दीकी असे सगळे एकत्र येत, तनुश्रीच्या आरोपांना मीडियासमक्ष उत्तर देणार आहेत. या पत्रपरिषदेत नाना पहिल्यांदा या प्रकरणाबद्दल जाहीररित्या आपली बाजू मांडताना दिसतील.
२००८ मध्ये हॉर्न ओके प्लीज सिनेमाच्या एका विशेष गाण्याचे शुटिंग सुरु असताना नाना पाटेकर यांनी जबरदस्तीने मिठीत घेतल्याच्या अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपाने अख्खे बॉलिवूड ढवळून निघाले आहे. विशेष म्हणजे, दिवसागणिक या वादाला एक वेगळेच वळण मिळतेय. या वादात अनेकजण नाना पाटेकर यांची पाठराखण करणारे आहेत, तसेच तनुश्रीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणारेही आहेत. आता तर हा वाद केवळ बॉलिवूडमधील ‘कास्टिंग काऊच’पुरता मर्यादीत न राहता त्याला राजकीय रंग मिळू पाहतोय. ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर झालेल्या घटनेनंतर नाना पाटेकर यांनी मनसेकडून आपल्याला धमकावले होते, या तनुश्रीच्या वादानंतर आता मनसेनेही या वादात उडी घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे, तनुश्री दत्ताला ‘बिग बॉस’च्या घरात पाठवाल तर आम्ही बिग बॉसचे घर उद्धवस्त करू, अशी धमकी मनसेने दिली आहे.