Join us

'ताऱ्यांचे बेट' चित्रपटाला झाली १० वर्षे पूर्ण, अभिनेता सचिन खेडेकरने शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 5:52 PM

'ताऱ्यांचे बेट' हा मराठी चित्रपट प्रदर्शित होऊन दहा वर्षे पूर्ण झाली आहेत.

नीरज पांडे आणि शीतल भाटिया यांच्या फ्रायडे फिल्मवर्क, अल्ट एंटरटेनमेंट आणि बालाजी मोशन पिक्चर्स निर्मित 'ताऱ्यांचे बेट' हा मराठी चित्रपट प्रदर्शित होऊन दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने प्रसिद्ध चित्रपट, टेलिव्हिजन आणि नाटक अभिनेता सचिन खेडेकर यांनी एक दिलखुलास व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओत सचिन खेडेकर यांनी सांगितले की, "मला 'ताऱ्यांचे बेट'चा भाग होण्याचे सौभाग्य मिळाले. हा एक अतिशय गोड चित्रपट आहे आणि मला यातील भूमिका साकारताना आनंद मिळाला. या विषयात ग्रामीण भागातील निरागसता आणि सकारात्मकता आहे आणि मला वाटते की आधीच्या तुलनेत या सगळ्याची आताच्या चित्रपटांमध्ये अधिक आवश्यकता आहे." 

चित्रपटाचे कथानक कोकणातील श्रीधर या सामान्य कारकुनाभोवती फिरते. तो आपल्या कुटुंबियांना मुंबईत फिरायला घेऊन येतो. शहराचा देखावा पाहून आश्चर्यचकित झालेला, त्याचा मुलगा पंचतारांकित हॉटेलमध्ये नेण्याचा आग्रह धरतो आणि आपल्या कुटुंबाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठीचा श्रीधरचा कठीण प्रवास सुरू होतो. चित्रपटामध्ये दाखवलेल्या मूल्यांबद्दल बोलताना खेडेकर म्हणतात, "पालक नेहमीच आपली नैतिक कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या मुलांवर सोपवतात आणि त्यांना हे सर्व शिकवण्याचा प्रयत्न करतात हे आपण नेहमीच पाहिले आहे. परंतु मुले तुम्हाला अधिक शिकविण्यात नेहमीच यशस्वी ठरतात, हे कदाचित कोणाला समजले असेल."

सचिन खेडेकर यांनी चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन करणारे किरण यज्ञोपवीत यांचे आभार मानले आणि नीरज पांडे यांच्या विषयीही गौरवोद्गार काढले, ते म्हणाले की, " क्रिएटिव्ह निर्माता, नीरज पांडे यांनी खूप मदत केली. त्यांनी या कथेला  पाठिंबा दिला आणि आम्ही हा चित्रपट तयार करू शकलो आणि त्यासाठी पुरस्कारही मिळाले. फ्रायडे फिल्मवर्क्सने, या सुंदर चित्रपटाची निर्मिती केल्याबद्दल आणि मला याचा भाग बनवल्याबद्दल आभार."या चित्रपटात दिवंगत अभिनेते विनय आपटे, अश्विनी गिरी, अश्मिता जोगळेकर, किशोर कदम, शशांक शिंदे आणि ईशान तांबे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. याची एकता कपूर, शोभा कपूर आणि नितीन चंद्रचूड यांनी सहनिर्मिती केली होती.

टॅग्स :सचिन खेडेकर