भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade) दिग्दर्शित TDM हा चित्रपट सोशल मीडियावर तुफान चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वीच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, या सिनेमाला शो मिळत नव्हते. त्यामुळे दिग्दर्शकांसह संपूर्ण टीमच्या डोळ्यात अश्रु आले होते. याविषयी त्यांनी त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या होत्या. लवकरच हा सिनेमा पुन्हा एकदा नव्याने रिलीज होत आहे. त्यामुळे तो सध्या चर्चेत आला आहे. यामध्येच सिनेमात मुख्य भूमिका साकारणाऱ्या पृथ्वीराज थोरात याने शो रद्द झाल्यानंतर आपल्या घरची परिस्थिती कशी होती हे सांगितलं आहे.
पृथ्वीराजने अलिकडेच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने डीटीएमचे शो रद्द झाल्यानंतर त्याच्या घरची आणि खासकरुन आईची परिस्थिती कशी झाली होती यावर भाष्य केलं. तो काळ फार कठीण होता असं त्याने सांगितलं.
"माझ्या आईने खूप कष्ट करुन मला इथे पाठवलं आहे. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझं गावं एकदम डोंगरात एक खेडं आहे. त्यामुळे माझी आई शिकलेली नाही. २०१३ ला मी इकडे आलो. मला इकडे पाठवण्यासाठी तिने कर्ज काढलं. त्यामुळे वर्षभर मेहनत करुन ती ते कर्ज फेडत होती. माझा सिनेमा येतोय हे समजल्यानंतर ती खूप खुश झाली होती. पण जेव्हा तिला सिनेमा रद्द झाल्याचं कळलं तेव्हा तिने फोन केला. पण, त्यावेळी फक्त तिचे हुंदके ऐकू येत होते. ती काहीच बोलू शकत नव्हती", असं पृथ्वीराज म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "ही गोष्ट मला अजिबात सहन होत नाहीये. माझ्याकडे शब्दच नाहीयेत बोलायला". डीटीएम सिनेमाचे शो रद्द झाल्यानंतर अनेक प्रेक्षकांना या सिनेमाला पाठिंबा दर्शवला. इतकंच नाही तर पुण्यातील शिरुर तालुक्यात प्रेक्षकांनी चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी रॅलीही काढली.
दरम्यान, आता पुन्हा एकदा नव्या दमाने टीडीएम प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या ९ जून रोजी हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा निर्णय भाऊराव कऱ्हाडे यांनी घेतलेला आहे.