Join us

पौगंडावस्थेकडून तरुणपणाचा भन्नाट प्रवास ‘‘बॉईज 2’’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2018 11:37 AM

शाळेच्या भिंती ओलांडून बॉईज कॉलेजच्या आवारात पोहचले. हा केवळ त्यांचा शैक्षणिक बदल नसून बदलत्या काळानुसार त्यांच्यातील मानसिक जडणघडणीचे प्रतिबिंब बॉईज 2 च्या भागात रसिकांना पाहवयास मिळणार आहे.

ठळक मुद्दे अवधुत गुप्तेच्या संगीताने चित्रपटात रंगत आणली आहे

शाळेच्या भिंती ओलांडून बॉईज कॉलेजच्या आवारात पोहचले. हा केवळ त्यांचा शैक्षणिक बदल नसून बदलत्या काळानुसार त्यांच्यातील मानसिक जडणघडणीचे प्रतिबिंब बॉईज 2 च्या भागात रसिकांना पाहवयास मिळणार आहे. पौगंडावस्थेकडून तरुणपणाच्या प्रवासाकडे निघालेल्या त्या मुलांची आगळीवेगळी व तितकीच भन्नाट गोष्ट म्हणजे बॉईज 2. 

गत शुक्रवारी बॉईज 2 हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यानिमित्ताने चित्रपटाची टीमने दैनिक लोकमतच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी दिग्दर्शक विशाल देवरुखकर, पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतीक लाड उपस्थित होते. देवरुखकर यांनी सांगितले, पहिल्या भागातील तिन्ही मुले आता मोठी झाली आहेत. आजकाल जो तो एका वेगळ्या आभासी दुनियेत रममाण झाला आहे. त्यांना भवतालच्या विश्वाचा विसर पडून ते सतत व्हाटस अप, फेसबुकमध्ये इतके बिझी आहेत की त्याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्वावर होत आहे. या मुद्याला चित्रपटाच्या माध्यमातून स्पर्श करण्यात आला आहे. मागील चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर दुस-या भागात काय विषय निवडायचा हे आमच्यासमोर आव्हान होते. परंतु तरुणाई, त्यांची बदलती भाषा, सोशल माध्यमांच्या गर्दीत त्यांची हरवलेली संवेदनशीलता यावर फोकस करण्याचे ठरवले. 

एस. पी. महाविद्यालयाचा विद्यार्थी असणा-या पार्थने मागील चित्रपटाच्या तुलनेत या चित्रपटातील भूमिका अधिक आव्हानात्मक असल्याचे सांगितले. तो म्हणाला, खरं तर चित्रीकरणात इतका बिझी होतो की, त्यामुळे कॉलेजमध्ये अनुभवायची मजा चित्रपटाच्या शूटींग दरम्यान अनुभवली. दुसरं म्हणजे लडाखमध्ये शुटींगच्यावेळी खुप उत्सुकता होती. तितक्याच अडथळ्यांना देखील तोंड द्यावे लागले. बॉईज पहिल्या भागातील संवादाने तरुणाईमध्ये धूम उडवून दिली होती. हिंदी, इंग्रजी आणि मराठी अशा तिन्ही भाषांची सरमिसळ करुन एक वेगळीच भाषा तरुणाईची आहे. त्या पिढीला जे वाटतं ते तितक्याच खुल्या पद्धतीने मांडण्याचं त्यांचे धाडस कौतुकास्पद असून तो फ्लो टिकवून ठेवण्याकरिता पूर्वी होते त्याच प्रकारचे संवाद प्रेक्षकांंना ऐकायला मिळणार आहे. या चित्रपटातून लव सॉंग करायला मिळत असल्याचा विशेष आनंद वाटत असल्याचे अभिनेत्री सायली हिने सांगितले. तर पहिल्या भागाचे कुठलेही दडपण न घेता मस्त मजेत दुसरा भागात सहभागी होता आले. त्यातून खूप काही शिकायला मिळाल्याची भावना प्रतीकने व्यक्त केली. 

 या चित्रपटात पार्थ भालेराव, सुमंत शिंदे, प्रतीक लाड, जयंत वाडकर, गिरीश कुलकर्णी, सायली पाटील यांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. विशाल देवरुखकर यांनी दिग्दर्शन केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया निर्माते आहेत. ॠषिकेश कोळी कथा, पटकथा व संवाद लेखन तर जटला सिध्दार्थ यांनी छायादिग्दर्शक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.  अवधुत गुप्तेच्या संगीताने चित्रपटात रंगत आणली आहे.  

टॅग्स :बॉईज २अवधुत गुप्ते