विधानसभा निवडणूक २०२४ चा काल निकाल लागला. सर्वांसाठीच हा निकाल अनपेक्षित होता. महायुतीने तब्बल २३० जागा जिंकल्या तर आघाडीला केवळ ४७ जागांवर समाधान मानावे लागले. फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांचा हा मोठा विजय आहे. तर दुसरीकडे मनसेला यावेळी एकाही ठिकाणी खातं उघडता आलेलं नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 'अनपेक्षित! तुर्तास इतकंच' असं ट्वीट केलं. मनोरंजनक्षेत्रातून राज ठाकरेंना पाठिंबा देणारे अनेक कलाकार होते. त्यातच अभिनेत्री तेजस्विनी पंडितही (Tejaswini Pandit) होती. निकालानंतरची तिची पोस्ट आता व्हायरल होत आहे.
तेजस्विनी पंडितची पोस्ट
"विजयी उमेदवारांचं अभिनंदन! कोण? कसं? आणि काहीजण का नाही हे अनुत्तरित राहिल, त्यांच्या मायक्रो मॅनेजमेंटला १०० पैकी १००...पण तरीही...राजसाहेब ठाकरे. एकनिष्ठ, सदैवसोबत...आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू"
अशा शब्दात तेजस्विनी व्यक्त झाली आहे. आपण आजही राज ठाकरेंसोबतच असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. तसंच महाराष्ट्र हरल्याच्या तिच्या वाक्याने लक्ष वेधून घेतलं आहे.
यावेळी राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेही पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात होते. मुलासाठी आणि इतर उमेदवारांसाठी राज ठाकरेंनी अनेक सभा घेतल्या. जनतेला आश्वासनं दिली. मात्र जनतेने त्यांचा कौल दिलाच. मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. आता राज ठाकरे निकालावर त्यांची सविस्तर प्रतिक्रिया कधी देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.