मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित अभिनयाबरोबरच तिच्या बेधडक व्यक्तिमत्वासाठीदेखील ओळखली जाते. अनेक खटकणाऱ्या गोष्टींबद्दल तेजस्विनी अगदी परखडपणे तिचं मत मांडताना दिसते. काही दिवसांपूर्वीच तेजस्विनीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोलबाबतचा व्हिडिओ शेअर करत ट्वीट केलं होतं. तिचं हे ट्वीट प्रचंड व्हायरल झालं होतं. तेजस्विनीच्या या ट्वीटनंतर तिच्या अकाऊंटवर कारवाई करत ब्लू टिकही काढून घेण्यात आली होती. तेजस्विनीने याबाबत लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं.
तेजस्विनी म्हणाली, "कुठल्याही प्रकारचं ट्वीट करताना मी जनता असते. अभिव्यक्ती स्वातंत्र आहे त्यामुळे मला काय वाटतं , हे बोलण्याचा अधिकार मला आहे. सत्तेत कोणीही असो, मला फरक पडत नाही. पण, सत्तेत बसल्यानंतर तुम्ही चुकत असाल. जनतेला गृहित धरत असाल, तर बोलणं गरजेचं आहे. आणि मी बोललंच पाहिजे. कारण, मी मतदान करते. मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. जर सरकार आपलं काम करत नाही, तर आपण प्रश्न का नाही विचारायचे."
पुढे राज ठाकरेंबद्दल बोलताना तेजस्विनी म्हणाली, "राज ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत, हे महाराष्ट्राचं दुर्देव आहे. त्यांचं नाही. कुठलाही मराठी माणसाला कोणतीही अडचण असेल, तर पहिला दरवाजा राज साहेबांच्या शिवतीर्थाचा ठोठावला जातो. एखाद्या नेत्याविषयी इतका विश्वास का वाटतो? कारण, तो माणूस मराठी माणसासाठी, मराठी भाषा टिकवण्यासाठी सातत्याने काम करतोय. त्या माणसासाठी ट्वीट केलं. याचा मला अभिमान आहे. मला त्यांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं आहे."
या सगळ्या प्रकरणानंतर तेजस्विनीचं राज ठाकरेंशी बोलणंही झालं. ती म्हणाली, "त्यांना काळजी वाटते. सर्वात आधी ते मला धन्यवाद म्हणाले. जनतेच्या बाजूने बोललात त्याबद्दल धन्यवाद, असं ते म्हणाले. कलाकारांनी बोललं पाहिजे. कलाकार हे प्रभावी व्यक्तिमत्त्व असतात. त्यामुळे त्यांनी बोललं पाहिजे, असं ते म्हणाले. तुम्ही भूमिका घेतली हेच मला आवडलं. प्रत्येक माणसाची भूमिका असली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं."