Join us

‘मराठी चित्रपटापुढे हिंदीसह तेलगुचेही आव्हान’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2017 12:01 PM

‘काकस्पर्श’, ‘नटसम्राट’ सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून स्वत:चा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर एक नवीन चित्रपट घेऊन ...

‘काकस्पर्श’, ‘नटसम्राट’ सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून स्वत:चा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर एक नवीन चित्रपट घेऊन आले आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून ‘प्यार का पंचनामा’ आणि ‘स्टुडंट आॅफ द इयर’सारखे चित्रपट पाहणारा प्रेक्षक मराठीकडे वळवायचा आहे. मात्र, सध्या हिंदी, इंग्रजी आणि तेलगु चित्रपटाचे खूप मोठे आव्हान मराठीसमोर असल्याचे ते सांगतात.एका चित्रपटाबद्दल सांगताना महेश मांजरेकर म्हणाले, ‘तरुणांचा चित्रपट आहे, अकरावी-बारावीचे एक वय असते, किशोरवयात केलेल्या चूका त्यातून झालेली धमाल चित्रपटात पाहायला मिळेल. बारावी संपली आता इंजिनिअरिंगला जायचे आहे, अशी एक परिपवक्ता तरुणांमध्ये निर्माण होण्याची स्टेजही अनुभवता येईल. हा चित्रपट टिपिकल हिंदीप्रमाणे करायचा होता. प्रेक्षक ‘प्यार का पंचनामा’ किंवा ‘स्टुडंट आॅफ द इयर’ हे चित्रपट पाहतात ना, त्याच दर्जाचा चित्रपट आम्हीही देऊ शकतो. आज कलात्मक आणि व्यावसायिक चित्रपट अशी गल्लत केली जात आहे. प्रत्येक वेळेला कलात्मक चित्रपट अपेक्षित करणे चुकीचे आहे. जर चित्रपटाचा बिझनेसच झाला नाही तर चित्रपट करण्यात काय अर्थ राहील.’‘कासव’ प्रदर्शित होतो, राष्ट्रीय पुरस्कार मिळवतो पण अजूनही तो कुणाला रिलीज करता येत नाही, कमी खर्चाचे चित्रपट झालेच पाहिजेत, यात दुमत नाहीच पण व्यावसायिक सुद्धा व्हायला पाहिजेत. लोक आले, पैसे मिळाले तर पुढे काहीतरी करू शकू. ‘बाहुबली’सारखा चित्रपट मराठीत होणे अवघड आहे. या चित्रपटाचा बिझनेस झाला ५०० कोटी रुपये. आपल्याकडे असे धाडस होऊ शकत नाही; कारण आपल्याकडे एवढा प्रेक्षक नाही. हे असे होऊ शकते का कधी? जरा अतिशयोक्तीच आहे, असे म्हणणारा समंजस मराठी प्रेक्षकवर्ग आहे. जो माणूस ‘स्टुडंट आॅफ द इयर’ बघायला जातो तोच मला मराठीकडे आणायचा आहे. ‘सैराट’ही कमर्शियल लव्हस्टोरी होती, त्याने खूप छान धंदा केला. व्यावसायिक चित्रपटांना लोक येतातच हे याचे उदाहरण. आता माझा  ‘काकस्पर्श’च पाहा, अभिरूचीसंपन्न प्रेक्षकांनी तो पाहिला, मात्र त्याचा व्यवसाय केवळ ८ कोटी इतकाच होऊ शकला. तळागाळातल्या लोकांनी तो पाहिला नाही, पण मी त्यांच्यासाठी चित्रपट बनवत नाही का? तर तसे नाही. त्यामुळे ‘हा’ चित्रपट तरुणाईसह तळागाळातील सर्वांसाठी आहे.मराठी चित्रपट हा पुण्या-मुंबईमध्ये अडकून पडला आहे, असे जे बोलले जाते त्यातही तितकेच तथ्य आहे असे ते म्हणतात. या शहरांच्या पलीकडे आपण बघत नाही, तिथेही बिझनेस आहेच ना. त्यांच्या गरजाही पूर्ण होणे गरजेचे आहे, म्हणूनच आम्ही विदर्भ-मराठवाड्यात गेलो, तिथे शोज केले, तिकडे प्रेक्षक आहे, पण तो त्याची भूक हिंदी चित्रपट पाहून शमवत आहे. आपण त्यांना चांगला कमर्शियल चित्रपट देणे आवश्यक आहे.शासनाचे मराठी चित्रपटांबाबतचे धोरण सकारात्मक आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. शासन मराठी चित्रपटांचे हितच पाहत आहे. मात्र, चित्रपट टॅक्स फ्री करून काही साध्य होणार नाही. कारण, शंभर दिडशे रुपये मोजून चित्रपट पाहण्याची सवय लोकांना लागली आहे. करमणूक कर शासनाने घ्यावा पण तो परत करावा, कारण करमणूक कराला पर्याय असतो की माझा चित्रपट जास्त चालला तर मला जास्त पैसे मिळतील.महाराष्ट्र सांस्कृतिक साहित्यदृष्ट्या संपन्न आहे. ‘नटसम्राट’ ४० कोटींपर्यंत गेला, पण तो १०० कोटीपर्यंत जाणे गरजेचे होते. साहित्यावर कलाकृती निर्माण करून उपयोग नाही, जानेवारीपासून एप्रिलपर्यंत केवळ चार चित्रपट चालले. तळागाळातील प्रेक्षक येणे गरजेचे आहे. राज्यात आज चित्रपटगृहांची संख्या कमी आहे. महाराष्ट्रात हिंदी चित्रपट जोरात चालतात आणि मराठी चित्रपट चालत नाही. हिंदीबरोबर इंग्रजी तमिळ, तेलुगू या चित्रपटांचे मोठे आव्हान आहे, यात मराठी चित्रपटांना चालविणे अवघड होत चालले आहे, यासाठी शासनाने चित्रपटगृहांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. दिवसाला पाच ते सहा शो चालले तर फायदा आहे. चित्रपटांचे बजेट हे ३ कोटीपर्यंत गेले आहे. पण हा चित्रपट सकाळी ९, दुपारी ३ ला पण चालला पाहिजे. आठवडा हाऊसफुल्ल झाला तर ४५ कोटी मिळतात त्यातले अर्धे वितरकाला जातात, निर्मात्याच्या वाट्याला खूप कमी पैसे येतात, त्यामुळे प्राईम टाईम नुसता देऊन उपयोग नाही.