आपल्याकडे शिक्षणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. शिक्षण म्हटले म्हणजे शाळा आली आणि शाळा आली म्हणजे अभ्यास आला. अभ्यास आला म्हणजे परीक्षाही आली. प्रत्येक परीक्षेसाठी मुले भरपूर अभ्यास करतात आणि एसएससी म्हणजेच १० वी च्या परीक्षेला नेहमीपेक्षा अधिक जोमाने अभ्यास करावा लागतो. १० वी म्हणजे आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा. ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ‘शिक्षित’ असा शिक्का बसतो. हल्ली १० वी ला प्रचंड महत्व आले असून विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत ही परीक्षा अत्यंत महत्वाची पायरी समजली जाते. १० वी चे टेन्शन असल्यामुळे मुलांना सतत अभ्यासाला लावणारे पालक सर्वत्र पाहावयास मिळतात. खरंतर ही परीक्षा महत्वाची असली तरी त्यासोबत येणारा मानसिक तणाव पालक आणि पाल्यांच्या मनावर आघात करून जातो हे कितपत योग्य आहे? अशाच मुलांच्या आणि पालकांच्या मनोस्थितीवर भाष्य करणारा एक मराठी चित्रपट येतोय ज्याचे नावही आहे ‘१० वी’.
१० वी ची परीक्षा हा विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील मैलाचा दगड असला तरीही त्यावेळी येणाऱ्या टेंशन्सचा व कदाचित त्यातून येणारा नैराश्याचा कसा सामना करता येऊ शकेल यावर उहापोह ‘१० वी’ चित्रपटातून करण्याचा प्रयत्न झाला आहे. या चित्रपटाची कथा, पथकथा आणि संवाद मयूर राऊत आणि पियुष राऊत यांचे असून या दोघांनीही या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे. निर्माते सुधीर जाधव यांनीच ‘१० वी’ प्रस्तुतसुद्धा केला आहे. देवेंद्र अरोडा हे सह-निर्मात्याच्या भूमिकेत आहेत. रविराज पवार व आकाश पवार यांच्या गीतांवर संगीतसाज चढविला आहे अरुण चिल्लारा, आकाश पवार आणि ऐश्वर्य मालगावे यांनी. छायांकन मनोज सी कुमार यांचे असून पराग खाऊण्ड यांनी संकलकाची भूमिका पार पाडली आहे. लेखक दिग्दर्शकांच्या मते हा चित्रपट विद्यार्थी आणि त्यांच्या जनकांच्या डोळ्यात अंजन घालणारा असेल व विषय जरी ‘टेन्शन’ वाला असला तरी तो चित्रपटातून हसत-खेळत मांडण्यात आला आहे. पालक आणि पाल्यांच्या १० वीच्या टेन्शनचा खात्मा करण्यासाठी मयूर राऊत व पियुष राऊत दिग्दर्शित ‘१० वी’ ८ फेब्रुवारी २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे