मराठी कलाविश्वातील गुणी अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर (madhurani gokhale-prabhulkar). उत्तम अभिनय आणि स्वभावातील साधेपणा यामुळे तिने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेच्या माध्यमातून मधुराणीला तुफान लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने अरुंधती ही भूमिका साकारुन घराघरात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मधुराणीने अलिकडेच एक पोस्ट शेअर करत 'एकदा काय झालं' या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
"एकदा काय झालं..गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट. एका अतिशय संवेदनशील आणि बहुगुणी व्यक्तीच्या लेखन , दिग्दर्शनातून उतरलेली ही गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट. आपण भरभरून जगत असतो, जीव लावून प्रेम करत असतो. एकमेकांना गोष्टी सांगत असतो कालच्या, आजच्या, उद्याच्या, खऱ्या, खोट्या , असलेल्या नसलेल्या माणसांच्या.... त्यातून बोध घेत असतो , आपलं जगणं त्यावर घासून पहात असतो सतत... त्यावर तर मोठे झालेलो असतो आपण...ह्या सगळ्या जगण्याच्या प्रवासात मात्र 'त्या' अंतीम सत्याचा जणू विसरच पडलेला असतो आपल्याला...ह्या सत्या कडे कसं पाहायचं असतं, त्याला कसं बरं सामोरं जायचं असतं , ते कसं स्वीकारायचं हे कुणीच कुणाला जवळ बसवून सांगत नाही किंबहुना टाळतोच. पण ही गोष्ट मात्र मित्रासारखी पाठीवर हात फिरवत, हळुवारपणे आपल्याला तिथपर्यंत नेऊन सोडते", असं मधुराणी म्हणाली.
पुढे ती म्हणते, "ह्यात रूपकात्मक वापरलेल्या amphi theatre च्या सगळ्यात वरच्या आणि बाहेरच्या पायरीवर आपण अगदी सुरुवातीला बसलेलो असतो... आणि एकेक पायरी हळूहळू उतरत पार रंगमंचावर जाऊन ठेपतो आणि मग आपल्याच आयुष्याचा,आपल्या जगण्याचा, नात्यांचा आपल्या भोवती फिरत शोध घ्यायला लागतो , अगदी आपल्याही नकळत....आणि हेच यश आहे ह्या चित्रपटाच. सलीलची ही अतिशय उत्तम कलाकृती...! चिंतन ची भूमिका साकारणाऱ्या अर्जून पूर्णपत्रेची एकाचवेळी सहजता आणि maturity वाखाणण्याजोगी आहे. सुमित .... पुनः एकदा तुम्हाला भारावून टाकतो .... प्रभावित करतो. पुष्कर, उर्मिला , राजेश ह्यांची ,आणि सर्व लहान मुलांची काम ही अतिशय अप्रतीम. सुहास जोशी आणि मोहन आगाशे ह्यांच्या विषयी किती आणि काय बोलणार . सलील , तुझ्या पुढच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहतोय .... इतकंच म्हणू शकते. संपूर्ण टीम आणि विशेषतः अशा प्रकारच्या स्क्रिप्ट वर विश्वास ठेवून , त्याची निर्मिती करणाऱ्या निर्मात्यांचं विशेष विशेष कौतुक."
दरम्यान, तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून या पोस्टवर सलील कुलकर्णीनेदेखील कमेंट करत तिचे आभार मानले आहेत. बऱ्याचदा मधुराणीला एखादी गोष्ट वा चित्रपट भावला की ती त्याच्यावर पोस्ट शेअर करत असते.