- समीर नाईक
पणजी - गोवा मराठी चित्रपट गेली १३ वर्षे सलगपणे राज्यात होत आहे, अनेक कलाकार, दिग्दर्शक, लेखक व इतर चित्रपट सृष्टीतील व्यक्ती येथे आवर्जुन येत असतात. इफ्फी आणि मराठी चित्रपट महोत्सवामुळे गोव्यात चित्रपटसृष्टीसाठी पुरक असे वातावरण तयार झाले आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री निलेश काब्राल यांनी केले. विन्सन वर्ल्ड आणि आयएफबी मॉड्यूलर किचन यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित १३ व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाच्या समारोप सोहळ्या दरम्यान प्रमुख पाहुणे या नात्याने निलेश काब्राल बोलत होते. यावेळी त्यांच्यांसाेबत विन्सन वर्ल्डचे संजय शेट्ये, श्रीपाद शेट्ये, जेष्ठ कलाकार डॉ. माेहन आगाशे, पार्थ भालेराव, सायली संजीव, तानाजी घाडगे व चित्रपटसृष्टीतील इतर मान्यवर अपस्थित होते.
राज्यात अधिकाअधिक चित्रपट तयार व्हावे आणि राज्याचे नाव व्हावे असे प्रत्येक गोमंतकियाला वाटते. खरतर यंदाचा हा चित्रपट महोत्सव १५ वा होणार होता, परंतु कोरोनामुळे दोन वर्षे महोत्सव झाला नाही. परंतु न थांबता शेट्ये बंधु यांनी जोमाने काम करत हा महोत्सव घडवून आणला, त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच. खुप कमी कालावधीत त्यांनी हे घडवून आणले. कलाकारांना देखील गोव्यात यायला आवडते, हे या महोत्सवातून दिसून आले, असे काब्राल यांनी पुढे सांगितले.
गेल्या तीन दिवस राज्यात झालेल्या या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाची सांगता काल तानाजी घागडे दिग्दर्शित पिल्लू बॅचलर या चित्रपटाने झाली. तर मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित सहेला रे या चित्रपटाने या महाेत्सवाचा पडदा उघडला होता.
या महोत्सवात सुमारे २० दर्जेदार चित्रपट दाखविण्यात आले हाेते. लोकांचाही चांगला प्रतिसाद या महोत्सवाला लाभला. तसेच नीना कुलकर्णी, सुहास जोशी, पुष्कर श्रोती, अनिकेत विश्वासराव, उमेश कामत, साेनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, मंजिरी ओक, छाया कदम, अभिषेक करगुटकर, प्रशांत पवार, आदिनाथ कोठारे,गजेंद्र अहिरे, किशोर कदम, मृण्मयी गोडबोले, सुव्रत जोशी, मिलिंद गुणाजी, मयूर बोरकर, शंकर धोत्रे, हेमांगी कवी, प्रियदर्शन जाधव, जितेंद्र जोशी, भारती दुबे, नेहा पेंडसे, रसिका आगाशे, स्मिता तांबे, सुमित तांडेल, डॉ. मोहन आगाशे, पार्थ भालेराव, शंतनु रोडे, संतोष पाठारे, मृण्मयी देशपांडे, शिवानी रणगोळे, मनाली दीक्षित, रवी जाधव, सिध्दार्थ मेनन, यासारख्या कलाकारांनी उपस्थिती लावली होती.