अंकुश चौधरी (Ankush Chaudhari), स्वप्नील जोशी (Swapnil Joshi), सई ताम्हणकर (Saie Tamhankar) आणि संजय जाधव (Sanjay Jadhav) ही टीम अकरा वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र येणार, अशी बातमी सर्वत्र झळकली होती. तेव्हापासूनच खरंतर या चित्रपटाविषयी चर्चा रंगली होती. अनेक तर्कवितर्कही काढले जात होते. परंतु आता या सगळ्यावरील पडदा उठला असून अखेर या चित्रपटाची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली आहे. 'पुन्हा दुनियादारी’ (Punha Duniyadari Movie) असे या चित्रपटाचे नाव असून ‘दुनियादारी’तील मैत्री प्रेक्षकांना पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. 'पुन्हा दुनियादारी'मध्ये सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी यांची यारी पाहायला मिळणार असली, तरी त्यांची कट्टा गँग ‘पुन्हा दुनियादारी'त त्यांना साथ देणार का, हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
‘पुन्हा दुनियादारी’च्या निमित्ताने निर्मात्या उषा काकडे यांनी अमेय विनोद खोपकर, स्वाती खोपकर आणि निनाद बत्तीन यांच्यासोबत असोसिएशन केले आहे. एवीके पिक्चर्स, उषा काकडे प्रोडक्शन्स, मैटाडोर प्रोडक्शन, व्हिडीओ पॅलेस निर्मित प्रदर्शित होणाऱ्या 'पुन्हा दुनियादारी' या चित्रपटाचे लवकरच चित्रीकरण सुरु होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव आहेत. अमेय खोपकर, स्वाती खोपकर, उषा काकडे, नानूभाई जयसिंघानी, निनाद बत्तीन निर्माते आहेत.
संजय जाधव म्हणाले...
दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले की, "शिरीन, श्रेयस, दिघ्या या मैत्रीचा संगम परत 'पुन्हा दुनियादारी'च्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ११ वर्षांची आतुरता संपत अखेर 'पुन्हा दुनियादारी’च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. विविध प्रोजेक्ट्च्या निमित्ताने या सगळ्यांसोबत काम केले. परंतु पुन्हा एकदा या टीमसोबत एकत्र काम करण्याची मजा काही औरच आहे. हे बॉण्डिंग इतके स्ट्राँग आहे की, त्याचे पडसाद 'पुन्हा दुनियादारी'मध्ये नक्कीच दिसतील. आता यात आणखी काय ट्विस्ट असणार, हे चित्रपट आल्यावरच कळेल. त्यात आता उषा काकडे यांसारख्या निर्मात्या आमच्या या कुटुंबात सहभागी झाल्या आहेत.''