प्रख्यात अभिनेत्री सुलोचना यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ९४ वर्षांच्या होत्या. आपल्या कसदार अभिनयानं अनेक दशके मनोरंजन जगत गाजवणाऱ्या सुलोचनादीदींना विविध मान्यवरांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही सुलोचनादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
राज ठाकरे आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, सुलोचना दीदींचं निधन झालं. 'दीदी' ही उपाधी चिकटणं जितकं सोपं, तितकी ती पेलवणं अधिक अवघड. ही उपाधी पुढे चिकटली काहींना पण पेलवता आली फक्त लता दीदींना आणि सुलोचना दीदींना. कारण दोघींच्यात असलेला सोज्वळपणा, ठेहराव आणि कामाप्रतीची निष्ठा ह्यामुळे.
हिंदी सिनेमात ६०, ७० आणि ८० च्या दशकाच्या पूर्वार्धापर्यंत 'आई' हे सिनेमातलं महत्वाचं पात्र असायचं. पण 'आई' पण पडद्यावर ज्यांनी जिवंत केलं ते फक्त निरुपमा रॉय आणि सुलोचना दीदींनी. बाकीची आईची पात्रं ही एकतर बालिश केली गेली आणि त्यांच्यात नकारात्मक छटा आणल्या गेल्या.
सुलोचना दिदींच्यात 'आईपण' हे अंगभूत होतं त्यामुळे त्यांना पडद्यावर भूमिका वठवताना विशेष अभिनय करावा लागलाच नाही. त्यामुळे त्यांच्या आईच्या भूमिका आयुष्यभर लक्षात राहिल्या. पण हिंदीत जितकं वैविध्य नाही मिळालं तितकं वैविध्य त्यांना मराठी सिनेमांत मिळालं, हे मराठी सिनेमाचं भाग्य.
एखादी भूमिका प्रेक्षकाला इतकी विश्वासार्ह वाटावी असा योग दुर्मिळ असतो जो सुलोचना दीदींच्या वाट्याला आला होता. अशी 'आई' होणे नाही, अशी 'दीदी' होणे नाही. सुलोचना दीदींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दात राज ठाकरे यांनी सुलोचनादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.