Join us

अखेरचा निर्णय प्रेक्षकांचाच असतो - रितेश देशमुख

By संजय घावरे | Published: October 31, 2023 6:21 PM

'मामी'मध्ये रितेशसह केदार शिंदे, वरुण नार्वेकर, सुजय डहाके, आशिष बेंडेने साधला संवाद

मुंबई - प्रत्येक दिग्दर्शकाची दिग्दर्शन शैली आणि दृष्टिकोन वेगळा असला तरी अखेरचा निर्णय प्रेक्षकांचा असतो. मराठी चित्रपट जितके लोकांशी कनेक्ट करू तितके चालतील. प्रमोशनच्या वेगवेगळ्या कॅम्पेन्सचा प्रेक्षकांवर प्रभाव पडतो. प्रेक्षकांना गृहित धरता कामा नये असे अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख म्हणाला. मामी फिल्म फेस्टिव्हलमध्ये आयोजित परिसंवादात रितेश बोलत होता. 

मामीमध्ये यंदा व्यावसायिक आणि कलात्मक सिनेमांचा संगम घडवत यंदा मराठी दिग्दर्शकांना चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले. यात दिग्दर्शक वरुण नार्वेकर, केदार शिंदे, रितेश देशमुख, सुजय डहाके आणि आशिष बेंडे यांनी सहभाग घेतला. रितेश म्हणाला की, महाराष्ट्रामध्ये प्रथम हिंदी आणि नंतर मराठीला प्राधान्य मिळते, पण थिएटर मिळवण्यासाठी मराठीला इतर भाषांमधील डब चित्रपटांशीही झगडावे लागते. अमेरिकेच्या तुलनेत आपल्याकडे खूप कमी थिएटर्स आहेत. थिएटर्स वाढवली तरी तिथेही हिंदीच उडी घेईल. मराठीद्वारे दिग्दर्शनाकडे वळण्याबाबत रितेश म्हणाला की, अभिनयात पदार्पणानंतर १० वर्षांनी वडीलांनी मराठीत काम करण्याबाबत विचारल्यावर मुंबई फिल्म कंपनीची सुरुवात केली. सहा मराठी सिनेमांची निर्मिती केली. हिंदीतून सुरुवात झाल्याचा अभिमान आहे, पण मराठीत काम करत असल्याचा त्याहीपेक्षा जास्त अभिमान आहे. दिग्दर्शनाचा निर्णय घेतल्यावर हिंदीतूनही पदार्पण करू शकलो असतो, पण मला 'वेड'ची निर्मिती करायची होती. त्यासाठी तीन दिग्दर्शकांशी संपर्क साधला. तिघेही बिझी होते. त्यामुळे स्वत:च दिग्दर्शनात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे रितेश म्हणाला. 

प्रथमच अशा परिसंवादात सहभागी होण्याबाबत केदार म्हणाला की, पन्नास वर्षांमध्ये केवळ गणपती आणि दिवाळी फेस्टिव्हलच पाहिले आहेत. कदाचित मी बरेच व्यावसायिक चित्रपट बनवल्याने अशा डिस्कशनसाठी बोलावले गेले नसेल. मराठीची स्पर्धा हिंदीसोबतच साऊथ आणि हॅालिवूडपटांशी आहे. एकीकडे मराठी आणि दुसरीकडे हे चित्रपट असतात. त्यामुळे शोकेसिंगचा प्रॅाब्लेम आहे. त्यामुळे 'बाईपण'च्या वेळी आणि नंतरही मराठीची गाडी छान सुरू राहिल असे सांगता येत नाही. चांगले काम करत राहावे लागणार आहे. 

सुजय डहाके म्हणाला की, माझे बरेच सिनेमे अगोदर फेस्टिव्हलमध्ये यशस्वी झाले आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचले. माझा 'श्यामची आई' ही बालपणातील आठवणीतून आकाराला आला आहे. मराठी चित्रपटांसाठी ओटीटी नाहीच. अॅमेझॅान, नेटफ्लिक्स मराठी सिनेमे घेत नाहीत. त्यामुळे सिनेमागृहांच्या संख्येसोबतच रिकव्हरी हा मराठीचा मोठा प्रॅाब्लेम आहे. यावर केवळ चर्चा होते, पण कोणीही हे गणित सोडवत नाही. सिनेमा बघणे ही संस्कृती जपली पाहिजे.

आशिष बेंडे म्हणाला की, 'आत्मफॅम्लेट' हेच टायटल का? हा प्रश्न अनेकांनी विचारला. सामान्य माणसाचे आत्मचरित्र आहे, जे केवळ एका कागदावरही छापता येऊ शकेल. त्यामुळे त्याला 'आत्मफॅम्लेट' हे शीर्षक दिले. शीर्षकामुळे सोशल मीडियावर चित्रपटाची चर्चा झाली. गाणी, कलाकार आणि कथेवर बरेच बोलले गेले. मराठी चित्रपटाचे थिएटरमधील बिझनेसचे गणित अनाकलनीय आहे. प्रेक्षक आणि मेकर्स यांच्यातील मधल्या फळीने अॅनॅलिसीसपेक्षा फॅक्ट्सचा विचार करायला हवा.