महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जगभरात साजरी होते. विदेशात असलेला मराठी माणूसही आपल्या राजाची जयंती धुमधडाक्यात आणि उत्साहात साजरी करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता रवी जाधवने बालशिवाजी सिनेमाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.
धार गाडून, आभाळ फाडून, मातीचा हुंकार, आलाया! वाघाची संतान, डोळ्यात तुफान, कराया प्रहार, आलाया!!! गेली ८ वर्ष जे स्वप्न उराशी बाळगलं… सादर आहे त्याची ही पहिली झलक. आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मंगल दिनी इरॉस इंटरनॅशनल, आनंद पंडीत मोशन पिक्चर्स, रवी जाधव फिल्म्स आणि लिजंड स्टुडिओज सादर करीत आहेत एक भव्य दिव्य मराठी चित्रपट ‘बाल शिवाजी’ असं कॅप्शन देते त्यांने पहिली झलक शेअर केली आहे. रवी जाधववर मित्रपरिवार आणि चाहते अभिनंदनाचा वर्षाव करतायेत. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा, वाह ! एकदम कडकड ! जय भवानी ! जय शिवाजी, हरहर महादेव..खूप खूप शुभेच्छा, जबरदस्त, कडक, जय शिवराज अशा प्रतिक्रिया या मोशन पिक्चरवर येतायेत.
तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे रवी जाधव यांनी नटरंग, बालक पालक, टाइमपास, न्यूड असे एकापेक्षा एक सरस सिनेमे दिले आहेत. अनेक वर्षे जाहिरात क्षेत्रात काम केल्यानंतर चक्क नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी सिनेमाची वाट चोखाळली. जे जे स्कूल आॅफ आर्ट्सचे विद्यार्थी असलेले रवी जाधव यांचा या क्षेत्रात येण्याचा प्रवासही अनोखा ठरला. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून बघितलं नाही.